मुंबई- काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळ अधिवेशनात गाजलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाबाबत आज मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी राज्यात हनी ट्रॅपमुळेच महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांचे सरकार आले होते. केवळ नाशिकच्या हनी ट्रॅपच्या सीडीमुळेच हा सत्तापालट झाला होता. आमच्याकडे याचे इतके भक्कम पुरावे आहेत की ते दाखवल्यास अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील. वडेट्टीवार यांच्या या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. इतकेच नव्हे तर हनी नाही आणि ट्रॅपही नाही असे विधान विधानसभेत करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलले का ? असा सवाल निर्माण झाला आहे.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी विधानसभेत महाराष्ट्रातील अनेक सरकारी अधिकारी आणि माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा आणि मंत्रालय, नाशिक व ठाणे ही हनी ट्रॅपची केंद्र झाल्याचा सनसनाटी आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी एक पेन ड्राईव्हही सभागृहात दाखवला होता. ते म्हणाले की मला कुणाला बदनाम करायचे नाही , पण यामुळे सरकारची महत्वाची कागदपत्रे अयोग्य माणसांच्या हाती यामुळे जात असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सरकारला हनीट्रॅपच्या मुद्यावर निवेदन करण्याचे सांगितले. पण त्यांच्या सूचनेनंतरही सरकारकडून निवेदन करण्यात आले नाही. दुसऱ्या दिवशीही हा विषय अधिवेशनात गाजला होता. नाना पटोले म्हणाले होते की, या प्रकरणी महाराष्ट्राची बदनामी होत आहे. राज्याशी संबंधीत महत्त्वाचे दस्तऐवज समाजविघातक संघटनाच्या हाती जात आहेत. मी कुणाचेही चारित्र्यहनन करत नाही. माझ्याकडे पेन ड्राईव्हही आहे. पण मला तो दाखवायचे नाही. पण एवढ्या गंभीर प्रकरणात सरकार निवेदन करण्यास तयार नाही, असा माझा आरोप आहे. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना यावर उत्तर दिले . त्यांनी या आरोपांची खिल्लीच उडवली. ते म्हणाले की कालपासून हनी ट्रॅपचा विषय सभागृहात येत आहे. यांनी कोणता हनी ट्रॅप आणला, हे मला समजतच नाही. नानाभाऊंनी तर कुठला बॉम्बच आणला म्हणे… नानाभाऊ आमच्यापर्यंत बॉम्ब आलाच नाही. तुमच्याकडे तो असेल तर आमच्याकडे दिला पाहिजे ना. यात ना हनी आहे ना ट्रॅप आहे. एखादी घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे. पण माहोल असा तयार होतो की, आजी-माजी मंत्री आणि आता सगळेच एकमेकांकडे संशयाने पाहत आहेत. इकडे आजी आहेत, तिकडे माजी आहेत. यात आजी मंत्री गुंतले आहेत की माजी मंत्री आहेत? या हनी ट्रॅपमध्ये कोण फसले आहे ? एकाही मंत्र्याच्या हनी ट्रॅपची तक्रार नाही. पुरावेही नाहीत. अशी घटनाही समोर आलेली नाही. हनी ट्रॅप नाही. एक तक्रार केवळ नाशिकच्या संदर्भात आली होती. एका महिलेने तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी ती मागेही घेतली. एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात तक्रार होती. मला त्याचे राजकारण करायचे नाही. पण आपण सातत्याने व्यक्तीचा, हॉटेलचा, हॉटेल मालकाचा उल्लेख करत आहात. ती व्यक्तीही काँग्रेसचा अध्यक्ष आहे. त्याने निवडणूकही लढली आहे. मी तुम्हाला एवढेच सांगतो की, अशा प्रकारे सभागृहाचा वेळ घालवणे, सभागृह सोडून जाणे, सभात्याग करणे योग्य नाही. नीट पुरावे आणायचे. जोरदार मांडायचे. सत्ताधारी पक्षाची बोलती बंद करून टाकायची. पण उगीच साप साप म्हणून भुई थोपटण्यात अर्थ नाही.
नाना पटोले यावर म्हणाले की महाराष्ट्राला धोका निर्माण झालेला आहे. ही गोष्ट आम्ही विधानसभेत सरकारला सांगत होतो. मी पेन ड्राईव्ह दाखवला त्यावेळेस अध्यक्षांनी मला म्हटले की नको नको, तो तुमच्याकडेच ठेवा. त्यावेळी माझ्याकडे पेन ड्राईव्ह मागितला असता तर मी दिला असता. मुख्यमंत्र्यांकडेदेखील याबाबत माहिती असेल. पण मुख्यमंत्री ती का लपवत आहेत? महाराष्ट्राचे नुकसान का करत आहेत?
वडेट्टीवार व पटोले यांच्या दाव्यावर शिंदे यांच्या शिवसेनेने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी मौन बाळगणेच पसंत केले. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, विधानसभेत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिले आहे की, ना हनी आहे ना ट्रॅप आहे. त्यांनीच असे स्पष्ट केल्याने हा मुद्दाच संपला आहे. शंकेला काही वावच राहू नये.
आरोप फेटाळले तरी
हॉटेलमधील ती रूम सील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनी ट्रॅपचे आरोप फेटाळले असले तरी तपास यंत्रणांनी या प्रकरणाची बारकाईने चौकशी सुरू केली आहे. हा संपूर्ण प्रकार जमीन व्यवहार आणि लायझानिंग करणाऱ्या टोळ्यांशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. हनी ट्रॅपचा वापर करून ७२ जमीन व्यवहार झाल्याचे म्हटले जात आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. विशेष तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी आज नाशिकमधील ज्या हॉटेलचे नाव या प्रकरणात पुढे आले आहे त्या हॉटेलवर धाड टाकून ज्या रूम मध्ये हे प्रकार घडत होते ती रूम सील केली.