संतोष देशमुखप्रमाणेच महादेव मुंडेंची क्रूर हत्या! 16 वार! श्वसननलिका कापली! हात, मान, पायावर जखमा

Mahadev Munde was brutally murdered like Santosh Deshmukh!


बीड- परळीतील व्यापारी महादेव मुंडे (Mhadev Munde) यांचा रक्तबंबाळ स्थितीतील मृतदेह तहसील कार्यालयासमोर सापडला. 2023 साली ही हत्या झाली, पण अद्याप सर्व आरोपींना पकडलेले नाही. महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari) यांनी यासाठी उपोषण केले, तरी ऐकले नाही तेव्हा आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यानंतरही अटक नाही. आता ज्याने सर्व आरोपींची नावे पोलिसांना दिली तो आरोपी वाल्मिक कराडचा एकेकाळचा मित्र विजयसिंह (बाळा) बांगर याने आज महादेव मुंडे यांना किती क्रूरपणे ठार केले ते सांगणारा शवविच्छेदन अहवाल उघड केला आहे. हा अहवाल वाचून थरकाप होईल. ज्या क्रूरपणे संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची बीडमध्ये हत्या करण्यात आली तितक्याच क्रूरपणे महादेव मुंडे यांची हत्या केली गेली. महादेव मुंडे बचावाचा प्रयत्न करीत राहिले, पण आरोपी राक्षसासारखे त्यांच्यावर अक्षरशः तुटून पडले होते.
शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे की, महादेव मुंडे यांच्या अंगावर 16 ठिकाणी वार करण्यात आले होते. प्रत्येक वार हा चार ते पाच सेंटीमीटर खालपर्यंत आहे. त्यांच्या गळ्यावर वार करण्यात आला. त्यात श्वसननलिका कापली गेली. त्यांची रक्तवाहिनी तुटली.
विजयसिंह बांगर याने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत सांगितले की, या हत्येमागे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचा हात आहे. त्याने मुंडेच्या मानेचा तुकडा काढून आणला आणि तो वाल्मिकला दाखवला असा खळबळजनक दावाही त्यांनी केला. त्यानंतर केज पोलिसांनी त्यांची 6 तास चौकशी केली.
महादेव मुंडे यांची 20 ऑक्टोबर 2023 रोजी परळीतील तहसील कार्यालय परिसरात हत्या करण्यात आली होती. त्याच दिवशी रात्री पान परळीच्या आझाद चौक पासून 300 मीटर अंतरावर त्यांची मोटरसायकल आढळली. दुसऱ्या दिवशी सकाळी मोटरसायकल सापडली तेथून 50 मीटर अंतरावरच त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्याजवळील मोबाईल, सोन्याची अंगठी, लॉकेट त्याचबरोबर एक ते दीड लाख रुपये हे गायब होते. 22 ऑक्टोबरला रात्री 12.15 ते 1.30 या वेळेत परळी उपजिल्हा रुग्णालयात सव्वा तास शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवाल परळी शहर पोलिसांना दिला होता. त्यात अतिरक्तस्राव झाल्याने शॉकमध्ये जाऊन महादेव मुंडे यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले होते.
या शवविच्छेदन अहवालानुसार, महादेव मुंडे यांच्या गळ्यावर समोरून वार केल्यामुळे त्यांची श्वसननलिका कापली गेली. रक्तवाहिन्या फाटल्या होत्या. मानेवर उजव्या बाजूला तोंडापासून कानापर्यंत वार होता. उजव्या हातावर 3 आणि डाव्या हातावर 3 वार करण्यात आले होते. तोंडापासून कानापर्यंतचा वार हा 13 सेंमी लांब व रुंदी व खोली दीड सेंमीपर्यंत होती. नाकावर 1 वार केला होता. गळ्यावरही 3 वार करण्यात आले. डाव्या गुडघ्यालाही खरचटले होते. त्यांच्या छाती, हात आणि चेहऱ्यावर जखमा होत्या. महादेव मुंडे यांचे शरीर रक्ताने माखलेले होते. त्यांच्या अंगावर रक्ताने माखलेली पांढरी बनियन आणि तपकिरी रंगाचे शर्ट होते. आदल्या रात्री जेथे मोटारसायकल सापडली तेथून जवळच असलेला त्यांचा मृतदेह पोलिसांना तेव्हाच का सापडला नाही हा सवाल आहे.
मुंडे कुटुंब आरोपींना अटक करण्याची मागणी करत तो मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवणार होते. पण पोलिसांनी आठ दिवसात आरोपी ताब्यात घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे अंत्यविधी करण्यात आला. या प्रकरणात 21 महिन्यांनंतर आरोपी अजूनही फरार आहेत. यामुळे महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी संताप व्यक्त करत काही दिवसांपूर्वी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यावर ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, हत्या होऊन 21 महिने झाले तरी आम्हाला शवविच्छेदन अहवाल मिळाला नव्हता. अहवाल वाचताना देखील डोळ्यात पाणी येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराडला ताब्यात घेऊन नार्को टेस्ट केली पाहिजे. कराडचा मुलगा श्री कराड, त्याचा निकटवर्ती भावड्या कराड उर्फ श्रीकृष्ण कराड याला देखील अटक केली पाहिजे. धनंजय मुंडे कुठे आहेत? आता त्यांना जाग का येत नाही? बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी मला न्याय द्यावा.