हगवणे माय-लेकानेच जेसीबी जप्त केलयाचे तपासात उघड

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या लता हगवणे आणि तिचा मुलगा शशांक हगवणे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. प्रशांत येळवंडे यांचा जेसीबी जप्त करण्यापासून जेसीबीचा ताबा घेण्यापर्यंत हगवणे माय-लेकाने कट रचल्याचे आता पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतले आहे.
हगवणे यांनी इंडसइंड बँकेकडून कर्ज घेऊन एक जेसीबी यंत्र विकत घेतले होते. त्याचे हफ्ते सुरू असतानाच हगवणेने कागदोपत्री करार करून ते जेसीबी यंत्र येळवंडे यांना विकले होते. त्यासाठी पाच लाख रुपये चेकद्वारे रक्कम आगाऊ देऊन उर्वरित रक्कम मासिक हफ्याने येळवंडे यांनी फेडायची,असे ठरले होते. या संपूर्ण व्यवहारात येळवंडे यांनी ११ लाख ७० हजार रुपये भरले. पण त्यानंतर हफ्ता थकल्याने जेसीबीसाठी कर्ज देणाऱ्या इंडसइंड बँकेने जीसीबी जप्त केला,असा बनाव हगवणे माय-लेकाने रचला. येळवंडेंकडून जेसीबी जप्त करून हगवणेंनी तो स्वतःच्या ताब्यात घेतला. याबद्दल येळवंडे यांनी विचारणा केली असता शशांक हगवणेने त्यांना बंदुकीचा धाक दाखवून पिटाळून लावले.
येळवंडे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता इंडसइंड बँकेने आपण जेसीबी यंत्र जप्त केले नाही,असा खुलासा केला.जप्त केलेली कोणतीही वस्तु बँक परस्पर कोणालाही परस्पर विकत नाही. त्या वस्तु बँक गोदामामध्ये ठेवते,असे बँकेने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता आपल्या साथीदारांकरवी हगवणे यांनीच जेसीबी जप्त करण्याचा बनाव रचल्याचे उघड झाले. त्यानंतर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी जेसीबी जप्त करणारे हगवणेचे साथीदार योगेश राजेंद्र रासकर (२५) गणेश रमेश पोतले (३०), वैभव मोहन पिंगळे (२७) याना ताब्यात घेतले.