Home / महाराष्ट्र / हॉटेल विट्स लिलावात खरेदीबाबत आरोपांनंतर मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाची माघार

हॉटेल विट्स लिलावात खरेदीबाबत आरोपांनंतर मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाची माघार

छत्रपती संभाजीनगर – विट्स हॉटेलचा लिलाव हा उबाठा नेते अंबादास दानवे यांच्या आरोपांमुळे वादात अडकला. त्यानंतर आता या लिलाव प्रक्रियेतून...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

छत्रपती संभाजीनगर – विट्स हॉटेलचा लिलाव हा उबाठा नेते अंबादास दानवे यांच्या आरोपांमुळे वादात अडकला. त्यानंतर आता या लिलाव प्रक्रियेतून आपला मुलगा सिद्धांत बाहेर पडत असल्याचे आज शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर केले. त्यानंतरही अंबादास दानवे यांनी आरोप केला की, शिरसाट यांची कंपनी नोंदणीकृत नाही, त्यांच्यासाठी कंपनीची उलाढाल किती असावी, आर्थिक पत किती असावी या अटी काढल्या होत्या. हे का केले याचे उत्तर लिलावातून बाहेर पडल्यावरही दिले पाहिजे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक मार्गावरील विट्स हॉटेल न्यायालयाच्या आदेशानुसार आणि एमपीआयडी कायदा तरतुदीनुसार जप्त करण्यात आले आहे. धनदा
कॉर्पोरेशनच्या मालकीच्या या हॉटेलचा सहा वेळा ई-लिलाव पुकारण्यात आला होता. मात्र सहाही वेळा लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर सातव्या लिलाव प्रक्रियेत मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट आणि त्यांच्या भागीदारांनी 64 कोटी 82 लाख रुपयांत विकत घेतले.
या लिलाव प्रक्रियेवर दानवे यांनी आक्षेप घेतला. 110 कोटी रुपये बाजारभाव असलेले हे हॉटेल शिरसाट यांच्या मुलाला अवघ्या 64 कोटी रुपयांत विकण्यात आले, असा आरोप दानवे यांनी केला होता. दानवे यांच्या या आरोपामुळे वाद निर्माण झाल्यानंतर आज शिरसाट यांनी आपला मुलगा आणि त्याचे भागीदार या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडतील, असे जाहीर केले. ते म्हणाले हिंमत असेल तर नव्याने होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हा, असे आव्हान नाव न घेता दानवे यांना दिले.
यावर अंबादास दानवे म्हणाले की, शिरसाटांची आधुनिक शेती आहे. मुंबईत 72 व्या मजल्यावर फ्लॅट आहे. इथे प्रचंड मोठे घर आहे. जिल्हा नियोजन बैठकीत यांचे कुटुंबातील लोक फोन करून दमदाटी करतात. बँक यांच्या घरी जाऊन कर्ज मंजूर करते मग सामान्यांच्या घरी बँक का जात नाही. या लिलावासाठी 40 कोटींची आर्थिक पत आणि 45 कोटींची उलाढाल या अटी होत्या. या अटी का काढल्या? यांच्या कंपनीत भागीदार कोण ते जाहीर करावे. राजकीय दबाव वापरून हे सर्व करून घेतले जात आहे.
4 महिन्यांपूर्वी सुरू असलेले हॉटेल अचानक बंद
विट्स हे छत्रपती संभाजीनगरात रेल्वे स्थानकावर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेले हॉटेल आहे. वेदांत हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडचे आबासाहेब देशपांडे हे त्याचे मूळ मालक होते. ते 17-18 वर्षांपूर्वी रमेश हवेली यांच्या धनदा कॉर्पोरेशनने टेकओव्हर केले. ही शेअर बाजारात नोंदणीकृत असलेली कंपनी आहे. काही वर्षांपूर्वी आर्थिक अडचणीत आल्याने प्रकरण कोर्टात गेले. एमपीडी कायद्यानुसार प्रकरण हॉटेल व इतर मालमत्ता जप्त झाली. हे प्रकरण विशेष सत्र न्यायालयात सात-आठ वर्षांपासून प्रलंबित आहे. दरम्यान, हे हॉटेल एसडीओंच्या ताब्यात गेले. या हॉटेलची विक्री करून आमची देणी द्यावी, अशी मागणी शेअरधारकांनी केल्यावर तसा आदेशही निघाला. मात्र, या हॉटेलमध्ये 150 कर्मचारी काम करत असल्याने त्यांची आधी सोय करा, अशी मागणी झाली. त्यानंतर हॉटेल चालवण्यास न्यायालयाने परवानगी देण्यात आली. तेव्हापासून ते चालू असून विठ्ठल कामत यांची कंपनी त्याचे व्यवस्थापन पाहत होती. हे हॉटेल चार महिन्यांपूर्वीपर्यंत व्यवस्थित चालत होते. मात्र, अचानक ते कोर्टाचा कुठलाही आदेश नसताना जाणीवपूर्वक बंद करण्यात आले. त्यानंतर लिलावाची प्रक्रिया घेण्यात झाली. 2022 मध्ये या हॉटेलचे मुल्यांकन 122 कोटी रुपये करण्यात आले होते आणि आता जे 175 कोटींचे आहे, त्याची जवळजवळ अर्ध्या किमतीवर बोली लावण्यात आली. त्यामुळे हा सगळाच संशयास्पद होताना दिसत आहे. कुणीतरी अज्ञात व्यक्ती हे करत आहे, असे हॉटेलच्या मूळ मालकांचे वकील मिलिंद पवार यांचे म्हणणे आहे.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या