Prakash Ambedkar- निवडणुकीत मतांची थेट चोरी होत नसून, मतदान बूथवर बसलेले अधिकारीच लबाडी करून सत्ताधारी पक्षाला 100 ते 150 अतिरिक्त मते टाकत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
देशात सध्या मतचोरीचा मुद्दा गाजत आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी मतचोरीच्या मुद्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ करून भाजपा निवडणुका जिंकत असल्याचा आरोप केला जात आहे. पण वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा आरोप केला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एखाद्या मतदाराला मतदानाचा अधिकारच मिळाला नाही, तर तो निवडणूक आयोगाने मतांची चोरी केली असे म्हणू शकतो. मात्र मतदाराला मतदान करण्याची संधी मिळाल्यानंतर तो माझे मत चोरले गेले, असे कसे म्हणू शकतो? चुकीच्या मुद्यावर लढा दिला, तर लोक साथ देत नाहीत, हे बिहारच्या निवडणुकांतून स्पष्ट झाले आहे. खरा मुद्दा मतांच्या चोरीचा नसून, मतदान केंद्रांवर बसलेले अधिकारीच प्रत्येक बूथवर सत्ताधारी पक्षाला 100 ते 150 मते देतात.सध्या मतांची चोरी होत नाही, तर अधिकची मते मिळावीत अशी परिस्थिती अधिकारी वर्गच निर्माण करत आहे.
ते पुढे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील संविधान रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाल्याने सत्ताधार्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते मुंबईतील विविध भागांत स्थानिक प्रश्नांवर आंदोलन करत असून, त्यातून वॉर्ड स्तरावर राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. सत्ताधार्यांच्या विरोधात आवाज उठत असल्याने पोलिसांच्या माध्यमातून नोटिसा पाठवणे, दडपशाही करणे, मारहाणीचे प्रकार घडत आहेत.
———————————————————————————————————————————————-
हे देखील वाचा –
कोकणात १५ वर्षांत एकही धरण नाही! नीलेश राणेंचा आरोप
मनरेगाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव; महात्मा गांधी ऐवजी पूज्य बापू









