Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आता सरकार देणार 40 हजारांचे कर्ज, पाहा माहिती

Ladki Bahin Yojana |

Ladki Bahin Yojana | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार असून, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले. या कर्जाचा हप्ता ‘लाडकी बहीण योजने’तून शासनातर्फे भरण्याची योजना विचाराधीन असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

मुखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना अजित पवार म्हणाले, “लाडक्या बहिणींना आता 40 हजार पर्यंत कर्ज दिले जाणार असून, सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे. या कर्जासंदर्भात आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे. काही बँका पुढे आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील बँकेसोबत मी बोलणार आहे. काही सहकारी बँका चांगल्या चालल्या आहेत. दरमहा 1,500 रुपये लाडक्या बहिणींना दिले जातात. त्याऐवजी 40 हजार रुपयांपर्यंत उद्योग, व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून द्यायचे आणि कर्जाचा हप्ता योजनेतून वळवता केला जाईल.”

भांडवल मिळाल्यास महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील आणि कुटुंब उभे करू शकतील, असेही पवार म्हणाले.

राज्यात ऑगस्ट 2024 पासून ‘लाडकी बहीण योजने’तील महिला लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये महाराष्ट्र सरकार देत आहे. नुकताच या योजनेचा 10 वा हप्ता वितरित झाला आहे. या योजनेवर सरकारचे 45 हजार कोटी रुपये खर्च होत आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

“एखाद्या महिन्यात थोडासा विलंब झाला, तरी विरोधक अफवा पसरवतात. पण बहिणींनी विरोधकांच्या या अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन पवार यांनी लाभार्थ्यांना केले.

ज्या महिलांना उद्योग सुरू करायचा आहे आणि भांडवल नाही, त्यांना या योजनेच्या हमीवर लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार असून, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.