रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून संभाजीराजे छत्रपती पुन्हा आक्रमक; म्हणाले…

Raigad Waghya Dog Samadhi |

Raigad Waghya Dog Samadhi | रायगडावर (Raigad) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) समाधीशेजारी असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून संभाजीराजे छत्रपती पुन्हा आक्रमक झाले आहेत. वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी या समाधीला कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याचा दावा करत ती हटवण्याची मागणी अधिक तीव्र केली आहे. त्यांनी या संदर्भात राज्य सरकारला (state government) पत्र पाठवल्यानंतरही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने आता पुन्हा एकदा त्यांनी ही मागणी केली आहे.

संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, वाघ्या कुत्र्याचा आणि रायगड किल्ल्याचा कोणताही ऐतिहासिक संबंध नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला त्याच उंचीची दुसरी समाधी उभी करणे हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी प्रत्यक्ष मदत करणारे तुकोजी होळकर महाराज होते आणि त्यांचे नाव समाधीस्थळी सोनेरी अक्षरात कोरले जावे. वाघ्या कुत्र्याच्या समाधीमागे केवळ दंतकथा आहे आणि त्याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही.

या मुद्द्यावर अधिक आक्रमक भूमिका घेत संभाजीराजे यांनी सरकारला लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने ते याची जबाबदारी घेतील आणि मुख्यमंत्र्यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच या संदर्भात एक समिती स्थापन केली जाईल, ज्यात सर्वपक्षीय सदस्यांचा समावेश असेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, संभाजीराजे यांनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या समर्थकांना आव्हान दिले आहे की, जर त्यांच्याकडे या समाधीच्या ऐतिहासिक अस्तित्वाचा कोणताही पुरावा असेल, तर तो त्यांनी सादर करावा. कोणताही इतिहासकार वाघ्या कुत्र्याचा इतिहासात उल्लेख करत नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

याव्यतिरिक्त, यावेळी बोलताना संभाजीराजे यांनी कोल्हापूरमधील पन्हाळगडाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवण्याबाबत स्थानिकांमध्ये असलेल्या गैरसमजांवर प्रकाश टाकला.