‘शरद पवारांना आजही दैवत मानतो, पण…’, अजित पवारांचे वक्तव्य चर्चेत

Ajit Pawar on Sharad Pawar | विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा सत्कार कार्यक्रमाचे पिंपरीत आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी शरद पवारांना आजही दैवत मानतो, असे वक्तव्य केले. सोबतच, त्यांनी पंतप्रधान मोदींचे देखील कौतुक केले. त्यांच्या या वक्तव्याची आता चर्चा रंगली आहे.

“मी आजही शरद पवारांना दैवत मानतो,” असे स्पष्ट करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाचीही प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, देशाच्या प्रगतीसाठी मोदी यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांच्या नागरी सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप (BJP) आमदार अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे आणि विविध पक्षांचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, “फक्त घराबाहेरच नाही, तर घरातही आम्ही पवार साहेबांना दैवत मानत आलो आहोत आणि अजूनही मानतो. मात्र आता देशाला मोदींसारखा कणखर मिळाला आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहून देशाच्या प्रगतीत हातभार लावत आहोत. देशाचा मानसन्मान वाढवण्यासाठी त्यांना पाठबळ दिले.”

यावेळी कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी स्पष्ट इशारा दिला. “तळ्यात-मळ्यात करू नका. एकाच मतावर ठाम राहा. द्विधा मनःस्थिती असेल तर ना स्थान मिळते, ना सन्मान,” असे म्हणत त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांचे उदाहरण दिले.

पिंपरी-चिंचवड परिसरातील लोकसंख्या लक्षात घेता, 2029 पर्यंत येथे पाच मतदारसंघ निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.