Home / महाराष्ट्र / Ajit Pawar: बारामतीला सिंगापूर बनवणार! अजित पवारांनी मांडला विकासाचा ‘मेगा प्लॅन’; विरोधकांवरही सडकून टीका

Ajit Pawar: बारामतीला सिंगापूर बनवणार! अजित पवारांनी मांडला विकासाचा ‘मेगा प्लॅन’; विरोधकांवरही सडकून टीका

Ajit Pawar Baramati Speech : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीचा धुराळा उडाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचारसभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला....

By: Team Navakal
Ajit Pawar
Social + WhatsApp CTA

Ajit Pawar Baramati Speech : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीचा धुराळा उडाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचारसभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. बारामतीमध्ये जे काही मोठे बदल झाले आहेत, ते फक्त अजित पवारच करू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधक केवळ निवडणुकीच्या काळात गल्लीबोळ दाखवायला येतात, पण एरवी पाच वर्षे हे लोक कुठे असतात, असा सवाल करत त्यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 1991 पासून बारामतीकरांनी आपल्याला साथ दिली असून दर्जेदार कामे कशी होतील, याकडेच आपण नेहमी लक्ष दिल्याचे त्यांनी सांगितले.

बजेटची मर्यादा आणि निधीची उपलब्धता

अजित पवार यांनी भाषणात विकासासाठी लागणाऱ्या निधीवर विशेष भाष्य केले. नगरपरिषदेचे वार्षिक बजेट केवळ 40 ते 45 कोटी रुपये असून एवढ्या मर्यादित रकमेत मोठे प्रकल्प राबवणे शक्य नसते. मात्र, आपण स्वतः सरकारमध्ये असल्याने आपल्या ओळखीचा वापर करून केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठा निधी बारामतीसाठी आणू शकतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले. विरोधकांकडे सत्ता नसल्याने ते केवळ आश्वासने देऊ शकतात, पण कामासाठी आवश्यक असणारा निधी फक्त आपणच उपलब्ध करून देऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील मोठे प्रकल्प

बारामतीमध्ये भविष्यात होणाऱ्या विविध विकासकामांची माहिती देताना अजित पवार म्हणाले की, सध्या 5 एकर जागेवर 55 कोटी रुपये खर्चाचे नर्सिंग कॉलेज आणि 10 एकर जागेवर सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल उभारले जात आहे. याशिवाय मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी 12 कोटी रुपये खर्चून भव्य सायन्स पार्क तयार करण्यात येत आहे. आगामी काळात बारामतीमध्ये आयआयटी आणि आयआयएम सारख्या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था आणण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

सिंगापूरच्या धर्तीवर स्मार्ट सिटीचे स्वप्न

बारामती शहराचा कायापालट करण्यासाठी अजित पवार यांनी ‘स्मार्ट सिटी’ची संकल्पना मांडली. सिंगापूरच्या धर्तीवर बारामतीचा सर्वांगीण विकास करण्याचे आपले स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही काळाची गरज असून त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. जाती-धर्मामध्ये कधीही अंतर पडू दिले नाही आणि भविष्यातही सर्वांना सोबत घेऊनच विकास साधला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

विरोधकांना आणि कौटुंबिक राजकारणावर टोला

विरोधकांवर टीका करताना अजित पवार काहीसे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. कधी कधी स्वतःच्या घरातील लोक सुद्धा साथ देत नाहीत, पण बारामतीची जनता आपल्याला खंबीर साथ देते म्हणूनच आपण झोकून काम करू शकतो, असे ते म्हणाले. बाहेरच्या लोकांच्या सांगण्यावरून निर्णय न घेण्याचे आवाहन करत “बाहेरच्यांचा अजिबात नाद करू नका, फक्त माझा नाद करा,” असे विधान त्यांनी केले. उमेदवारांपेक्षा आपल्याकडे पाहून मतदान करा, त्यांच्याकडून काम करून घेण्याची पूर्ण जबाबदारी माझी असेल, असे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले.

हे देखील वाचा – Ravindra Dhangekar : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब; पण बैठकीत रवींद्र धंगेकरांना ‘नो एन्ट्री’

Web Title:
संबंधित बातम्या