कोल्हापूर – शक्तिपीठ (Shaktipeeth Highway) हटाव,कोल्हापूरला महापुरापासून बचाव, शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे, जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची,अशा घोषणा देत शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काल अंबाबाई मंदिर परिसर दणाणून सोडला. आई अंबाबाई शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी दे, उदे गं आई उदे , असा गजर आणि गणपतीची आरती करून करवीर निवासिनी अंबाबाईला साकडेही घालतले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी (Farmers) आई अंबाबाईला साकडे घातले. यावेळी शेट्टी म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गासाठी पुन्हा भराव टाकावा लागणार असल्यास, बिंदू चौकापर्यंत महापुराचे पाणी पोहोचेल आणि निम्मा कोल्हापूर जलमय होईल. या महामार्गाला कोल्हापूर, सांगलीसह बारा जिल्ह्यांतील जनतेचा तीव्र विरोध आहे. मात्र, कोल्हापुरात विरोध नाही, असा बनाव काहीजण मुंबईत बैठक घेऊन करत आहेत. हेच लोक शक्तिपीठचा पाठिंबा देत कोल्हापूरच्या महापुराची स्थिती आणखी गंभीर करत आहेत. २०१९ साली सध्याच्या महामार्गावर मातीचा भराव टाकल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातही पाणी घुसले होते.
शक्तिपीठला उपमार्ग म्हणून कणेरीमठ ते जोतीबा असा एक नवा रस्ता करण्याचे नियोजन आहे. मात्र, या रस्त्यामुळे ऊस शेतीचे मोठे नुकसान होणार आहेत. भोगावती, कासारी नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलासाठी भराव टाकला, तर पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात तुंबून राहिल. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे (UBT) विजय देव, रविकिरण इंगवले, सचिन चव्हाण, राजेश लाटकर, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, अजित पोवार आदी सहभागी झाले होते.