Amravati New Airport | अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती शहराजवळील बेलोरा येथे उभारण्यात आलेले नवीन विमानतळ (Airport) अखेर 16 एप्रिल 2025 पासून व्यावसायिक उड्डाणासाठी खुले होणार आहे. पश्चिम विदर्भातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
16 एप्रिल रोजी होणाऱ्या भव्य उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित राहणार आहेत.
‘उडान’ (UDAN Scheme) योजनेअंतर्गत सुरु होणाऱ्या या सेवेमुळे क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि पर्यटनाला मोठा बळकटी मिळणार आहे.
हवाई प्रवासाची सोपी वाट
राज्य सरकारच्या पाठबळाने आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) मार्फत उभारलेले हे विमानतळ आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. PAPI (Precision Approach Path Indicators) सारखी सुरक्षा प्रणाली बसवण्यात आली असून, सुरळीत आणि सुरक्षित लँडिंग सुनिश्चित करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
एअर इंडियाची (Air India) उपकंपनी अलायन्स एअर (Alliance Air) 16 एप्रिलपासून अमरावती ते मुंबई ही पहिली सेवा सुरु करणार आहे. 72 आसनांचे विमान सकाळी 11:30 वाजता अमरावतीहून उड्डाण करेल आणि दुपारी 1:15 वाजता मुंबईत उतरेल. केवळ 2,100 रुपये या तिकीट दरात ही सेवा सध्या सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशा आठवड्यातील तीन दिवशी उपलब्ध राहणार आहे.
स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
या विमानतळामुळे पश्चिम विदर्भातील शेतकरी, व्यावसायिक, व्यापारी आणि पर्यटक यांच्यासाठी जलद वाहतूक शक्य होणार आहे. विशेषतः नाशवंत कृषी उत्पादने मुंबईच्या बाजारपेठेत वेळेत पोहोचवण्याची संधी निर्माण झाली आहे. यामुळे विक्रीत वाढ, नवीन गुंतवणूक, आणि रोजगाराच्या संधी वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे पर्यटन क्षेत्रालाही फायदा होईल.
हे देखील वाचा – मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला फरफटत आणले भारतात, पहिला फोटो आला समोर