मुंबई – अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan )याला तत्कालिन अंमली पदार्थ विरोधी दलाचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede)यांनी एका क्रुझवर अटक केल्यानंतर शाहरुख खानकडे लाच मागितल्याच्या आरोप करण्यात आला होता. हा आरोप रद्द करण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court)दाखल केली होती. या प्रकरणी तीन महिन्यात चौकशी पूर्ण करण्यात येईल असे सीबीआयच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले.
समीर वानखेडे यांनी आपल्यावरील आरोप रद्द करण्यासाठी केलेल्या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात न्या. अजय गडकरी व न्या. राजेश पाटील यांच्या पीठासमोर झाली. यावेळी पीठाने सीबीआयला या प्रकरणी चौकशीसाठी इतका वेळ का होत आहे? असा प्रश्न केला. यावर सीबीआयचे वकील कुलदिप पाटील काही उत्तर देत असताना न्यायालयाने म्हटले की मोघम उत्तर देऊ नका , काहीतरी नेमके सांगा. तुम्हाला या प्रकरणाच्या चौकशीसाठी किती वर्ष पाहिजेत ते स्पष्ट सांगा. त्यावर वकीलांनी या प्रकरणी तीन महिन्यात चौकशी पूर्ण करणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. समीर वानखेडे यांचे वकील आबाद फोंडा यांनी सांगितले की, सीबीआय प्रत्येक वेळी महाधिवक्ता तुषार मेहता सुनावणीसाठी येणार असल्याचे कारण सांगून वेळ काढत आहे. त्याचा परिणाम माझ्या अशीलाच्या कारकिर्दीवर होत आहे. सीबीआयने पुढची तारीख मागितली असता न्यायालयाने त्याला जोरदार आक्षेप घेतला हे नेहमीचेच होत असून आता निश्चित कालमर्यादा द्या.
