आषाढी यात्रेसाठी एसटी सज्ज! 5,200 विशेष बसेसची सोय, गाव ते पंढरपूर थेट सेवा

Ashadhi Special Buses

Ashadhi Special Buses | पंढरपूरच्या आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) यात्रेसाठी लाखो वारकरी आणि भाविकांना प्रवास सुलभ व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) मोठी तयारी केली आहे. यंदा यात्रेकरूंना 5,200 विशेष बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. यासोबतच, गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी विशेष बससेवेची घोषणाही त्यांनी केली.

पंढरपूर येथील नियोजन बैठकीत सरनाईक यांनी सांगितले की, राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास, त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाणारी एसटी बस उपलब्ध होईल. यासाठी भाविकांनी जवळच्या आगाराशी संपर्क साधावा. गेल्या वर्षी एसटीने 5,000 बसेसद्वारे 21 लाख भाविकांची यशस्वी ने-आण केली होती.

या विशेष बससेवेत शासनाच्या सर्व सवलती लागू असतील. यामध्ये 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ आणि महिलांसाठी 50% तिकीट सवलत देणारी ‘महिला सन्मान योजना’ यांचा समावेश आहे.

पंढरपूर यात्रेतील प्रचंड गर्दी लक्षात घेता, प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. यात चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेजजवळ) आणि विठ्ठल कारखाना स्थानक यांचा समावेश आहे.

विभागनिहाय बससेवा

  • चंद्रभागा बसस्थानक: मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे आणि पंढरपूर आगार.
  • भीमा यात्रा बसस्थानक: छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती.
  • विठ्ठल कारखाना: नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर.
  • पांडुरंग बसस्थानक: सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

यात्राकाळात एसटी कर्मचाऱ्यांसाठी चहा, नाश्ता आणि जेवणाची मोफत व्यवस्था केली जाईल, असेही सरनाईक यांनी जाहीर केले.

दरम्यान, पंढरपूर येथील आषाढी यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक जमतात. या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 1 जुलै 2025 ते 10 जुलै 2025 या कालावधीत पंढरपूर आणि मिरजसाठीएकूण 80 आषाढी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल.