Ashwini Bidre Murder Case | पनवेलमधील सत्र न्यायालयाने (Panvel Sessions Court) महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अश्विनी बिद्रे-गोरे (Ashwini Bidre) हत्या प्रकरणाचा निकाल दिला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे (Ashwini Bidre) यांची हत्या केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला (Abhay Kurundkar) दोषी ठरवण्यात आले आहे. त्याच्या दोन सहकाऱ्यांना महेश फलनिकर आणि कुंदन भंडारीला पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले, तर चौथा आरोपी राजू पाटील (Raju Patil) याला पुराव्याअभावी निर्दोष ठरवण्यात आले.
विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीप घरात यांनी स्पष्ट केलं की, “मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यावर खुनाचा आरोप सिद्ध झाला असून, बाकी दोघे पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी ठरले आहेत. राजू पाटील याला मात्र कोणताही स्पष्ट पुरावा नसल्याने निर्दोष सोडलं गेलं.”
हा गुन्हा एप्रिल 2016 मध्ये घडला होता. ठाणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या अश्विनी बिद्रे (Ashwini Bidre) यांचा मृत्यू त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामुळे झाल्याचं तपासात निष्पन्न झालं. अभय कुरुंदकर (Abhay Kurundkar) याच्यासोबत त्यांचे प्रेमसंबंध होते. कुरुंदकरने लग्नाचे वचन दिले होते. मात्र, वैयक्तिक वाद टोकाला गेल्यावर हत्या घडल्याचं पोलिसांनी निष्पन्न केलं.
अनेक वेळा शोधमोहीम राबवूनही अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह सापडलेला नाही. तरीही डिजिटल पुरावे — व्हॉट्सॲप संभाषण, संशयास्पद मेसेजेस आणि GPS लोकेशनच्या मदतीने पोलिसांनी आरोप सिद्ध केले. यामध्ये अभय कुरुंदकर याने तिचा मृतदेह वसई खाडीत (Vasai Creek) टाकल्याचा दावा करण्यात आला होता.
मार्च 2019 मध्ये अलिबाग न्यायालयाने राजू पाटील (Raju Patil) याचा डिस्चार्ज अर्ज फेटाळला होता, कारण GPS डेटाद्वारे तो घटनेच्या वेळी कुरुंदकरसोबत असल्याचे आढळले होते. घटनेच्या वेळी कुरुंदकर ठाणे ग्रामीण पोलिसात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. पनवेल न्यायालय दोषी ठरलेल्या आरोपींना 11 एप्रिल रोजी शिक्षा सुनावणार आहे.