महापौर निवासातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा मार्ग मोकळा; सर्व विरोधी याचिका फेटाळल्या

Balasaheb Thackeray Memorial in Mayors Bungalow

मुंबई – शिवसेनाप्रमुख (shivsena) दिवंगत बाळासाहेब ठाकरे (hinduhrudaysamrat balasaheb thackeray) यांच्या दादर शिवाजी पार्क (Dadar Shivaji Park) येथील महापौर बंगल्यातील स्मारकाला विरोध करणाऱ्य़ा सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court)आज फेटाळून लावल्या. त्यामुळे या स्मारकाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

गेल्या आठ वर्षांपासून महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या विरोध अनेक याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित होत्या. या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर गेल्या आठवड्यांत दोन तास सविस्तर सुनावणी झाली होती. त्यावेळी याचिकाकर्ते, राज्य सरकार आणि स्मारक समितीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.

या स्मारकाला माहिती अधिकार कार्यकर्ते भगवानजी रयानी, जनमुक्ती मोर्चा या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष मानव जोशी आणि पंकज राजमाची यांनी तीन स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिले होते. महापौर बंगला ऐतिहासिक वारसा वास्तू आहे. तसेच हा परिसर किनारा नियंत्रण क्षेत्रात (सीआरझेड) मोडतो. असे असतानाही त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे,असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला होता. दुसरीकडे सर्व निकष आणि नियांचे पालन करूनचे निर्णय घेण्यात आल्याचा प्रतिदावा सरकारच्या वतीने करण्यात आला होता. तो मान्य करून उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या.