भंडारा – भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक (Bhandara District Central Bank Election) तब्बल ९ वर्षांच्या प्रदीर्घ मुदतीनंतर पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) आमदार नाना पटोले (Nana Patole) यांच्या परिवर्तन पॅनलला मोठा धक्का बसला आहे. २१ जागांपैकी १५ जागांचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये अजित पवार गटाचे (Ajit Pawar group) खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या महायुतीच्या (Mahayuti) सहकार पॅनलने ११ जागांवर विजय मिळवला आहे. तर परिवर्तन पॅनल फक्त ४ जागांवरच विजयी ठरले.
उर्वरित ६ जागांचा निकाल न्यायालयीन प्रक्रियेमुळे अद्याप थांबलेला आहे. त्याबाबत उद्या निर्णय अपेक्षित आहे. मात्र, ११ जागांचा स्पष्ट विजय मिळाल्याने सहकार पॅनलचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विद्यमान अध्यक्ष सुनील फुंडे यांच्याच ताब्यात बँकेची सूत्रे जाणार हे निश्चित झाले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा सुनील फुंडे यांनी दूध संघ गटातून ४४ मतांनी दारुण पराभव केला. फुंडे यांना ९३ तर पडोळे यांना फक्त ४९ मते मिळाली. या पराभवाला काँग्रेसमध्ये असलेले अंतर्गत मतभेद आणि समन्वयाचा अभाव कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे मजूर संघ गटातही सहकार पॅनलचा जोर दिसून आला. या गटात सहकार पॅनलचे कैलाश नशीने यांनी विद्यमान अध्यक्ष भ.सु. खंडाईत यांचा १६ मतांनी पराभव करत पूर्वीच्या पराभवाचा बदला घेतला.
या संपूर्ण निवडणुकीत तब्बल १०३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १०६२ मतदारांपैकी फक्त २३ मतदारांनी मतदान टाळले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी तब्बल ९८ टक्क्यांवर पोहोचली. या निकालामुळे सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा फुंडे यांचे वर्चस्व दिसून आले . प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनलने हा विजय मिळवून काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे.