मुंबई- वडिलांची तब्येत बिघडली असून त्यांना भेटण्यासाठी तात्पुरता जामीन मिळावा,अशी विनंती करणारी याचिका भीमा-कोरेगाव (Bhima-Koregaon) हिंसाचार व एल्गार परिषद प्रकरणातील एका आरोपीने उच्च न्यायालयात (High Court) केली आहे. न्या. अजय गडकरी आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने या जामीन अर्जावरील सुनावणी दोन आठवड्यासाठी तहकूब केली.
उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलेल्या भीमा- कोरेगाव प्रकरणातील या आरोपीचे नाव रमेश गायचोर असे आहे. वडिलांची प्रकृती बिघडली असून त्यांना भेटण्यासाठी जामीन देण्याची विनंती रमेश गायचोरने केली. उच्च न्यायालयाने याचिकेची दखल घेत राष्ट्रीय तपास यंत्रणेला (National Investigation Agency) यावर उत्तर देण्याचे आदेश देत सुनावणी दोन आठवड्यापर्यंत तहकूब केली. गायचोर न्यायालयीन कोठडीत असून वडिलांच्या प्रकृतीचे कारण देत त्याने तात्पुरता जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता,मात्र विशेष न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्याने त्याने सत्र न्यायालयाच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान दिले आहे. गायचोरचे वडील ७५ वर्षांचे असून ते आजारी असल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल केले आहे.याचा विचार करून मानवतेच्या दृष्टिकोनातून न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर करावा, अशी विनंती गायचोरच्या वकिलांनी केली आहे.