Ganesh Festival : मुंबई महानगरपालिकेतील (BMC) भ्रष्टाचाराची एकाहून एक सरस प्रकरणे उघड होत असताना आता त्यात गणेशोत्सवासाठी पालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या विविध व्यवस्थांवर केला जाणाऱ्या खर्चाची आकडेवारी डोळे पांढरे करणारी आहे.माहिती अधिकाराच्या (Right to Information) माध्यमातून हाती आलेल्या माहितीनुसार सन २००२-०८ ते सन २०२४-२५ पर्यंतच्या सुमारे १७ वर्षांत पालिकेने गणेशोत्सवावर तब्बल २४७.७९ कोटी रुपये खर्च केले आहेत.हा एवढा खर्च झाला तरी कसा,असा प्रश्न आता सामाजिक कार्यकर्ते विचारू लागले आहेत.
वॉचडॉग फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे (NGO Watchdog Foundation)विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा (Godfrey Pimenta)यांनी माहिती अधिकाराखाली ही माहिती मिळविली आहे.महानगरपालिकेने दिलेली ही आकडेवारी संशयास्पद आहे. कारण कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या कालावधीतही पालिकेने गणेशोत्सवावर वर्षाला २० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे म्हटले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी तसेच गणेश मिरवणुकांच्या मार्गावर बॅरिकेड लावणे, विसर्जन स्थळांवर मंडप,ध्वनिक्षेपक यंत्रणा लावणे आणि गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण करणे आदि कामे पालिकेच्या वतीने केली जातात. मुंबईत गणेशोत्सव दहा दिवस धुमधडाक्यात साजरा केला जात असला तरीदेखील पालिकेने दाखवलेला खर्च अव्वाच्या सव्वा असल्याचे मत पिमेंटा यांनी व्यक्त केले आहे.सार्वजनिक गणेशोत्सवाला स्थानिक राजकीय नेते बऱ्याच गोष्टींसाठी स्वतःहून खर्च करतात.असे असताना पालिकेकडून दरवर्षी गणेशोत्सवावर खर्च वाढत कसा जातो,असा सवालही पिमेंटा यांनी उपस्थित केला आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार सन २०२४-२५ च्या गणेशोत्सवावर पालिकेने १७ वर्षांत सर्वाधिक ५४ कोटी ४७ लाख रुपयांचा खर्च केला.त्याआधी २०२३-२४ मध्ये ४९ कोटी १० लाख रुपये खर्च झाल्याचे आकडेवारीवरून दिसते.मागील पाच वर्षांत या खर्चात सातत्याने वाढ होताना दिसते.कोरोना महामारीच्या काळातही गणेशोत्सवावर प्रचंड खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे.त्यामुळेच यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे , असे स्पष्ट दिसत आहे,असे पिमेंटा म्हणतात.
दुसरे एक माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली (RTI activist Anil Galgali)यांनीदेखील गणेशोत्सवाच्या व्यवस्थापनाच्या नावाखाली पालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या खर्चाची बारकाईने तपासणी केली गेली पाहिजे,असे मत व्यक्त केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हवामान विभागाचा अलर्ट! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार,राज्यातील 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट