कराड- उद्योगपती दिवंगत डॉ. नीलकंठराव कल्याणी यांची कन्या सुगंधा कल्याणी (हिरेमठ) यांनी कराडमधील वडिलोपार्जित मालमत्तेच्या मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी काल या प्रकरणातील खटल्यात दिवाणी न्यायालयात न्यायाधीश आरएस पाटील-भोसले यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. नीलकंठराव यांनी २०१२ मध्ये दाखल केलेल्या खटल्यात वारसदार म्हणून सहभागी करून घेण्याचा हा अर्ज असून तो न्यायालयाने दाखल करून घेतला आहे. याबाबतची पुढील सुनावणी ३१ जुलै रोजी होईल, अशी माहिती सुगंधा यांच्या वकील सुखदा वागळे यांनी दिली. यावेळी तेथे सुगंधादेखील उपस्थित होत्या.
अॅड. वकील वागळे म्हणाल्या की, दिवंगत डॉ. कल्याणी २००८ साली आजारी होते. त्या काळात त्यांनी कऱ्हाडमधील वडिलोपार्जित मालमत्तेच्या देखरेखेसाठी त्यांचा लहान मुलगा गौरीशंकर कल्याणी आणि त्यांच्या कुटुंबाला पॉवर ऑफ अॅटर्नी (कुलमुखत्यारपत्र) देण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात तो दस्तऐवज करताना त्यात दान आणि मालमत्ता हस्तांतरणाचा अधिकार जोडण्यात आला. इतकेच नव्हे तर गौरीशंकर यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याचेही नाव त्यात समाविष्ट करण्यात आले. त्या आधारे कराडच्या मालमत्ता गौरीशंकर यांच्या नावे हस्तांतरित झाल्या. यानंतर नीलकंठराव यांना फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी कुलमुखत्यारपत्र रद्द केले आणि त्याविरोधात २०१२ मध्ये न्यायालयात धाव घेतली. मात्र, २०१३ मध्ये नीलकंठराव यांचे निधन झाले. त्यामुळे हा खटला प्रलंबित राहिला. या सगळ्या घडामोडींबाबत सुगंधा यांना काहीही माहीत नव्हते. सुगंधा यांना त्याबाबत नुकतेच समजले. त्यानंतर त्यांनी वडिलांच्या खटल्यात स्वतःचा वारस म्हणून समावेश करून घेण्यासाठी अर्ज दाखल केला.