सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल होणार

Somnath Suryawanshi Death

मुंबई – परभणी येथील संविधान (Constitution) शिल्प विटंबना प्रकरणी आंदोलन करणार्या सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi)या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांवर (police)गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad bench)दिला आहे. सोमनाथ याच्या आईने मुंबई उच्च न्यायालयात याचिका (petition)दाखल केली होती. वकील प्रकाश आंबेडकर यांनी या याचिकेवर न्यायालयात सूर्यवंशी यांची बाजू मांडली होती.

१६ डिसेंबर २०२४ रोजी न्यायालयीन कोठडीत सोमनाथचा मृत्यू झाल्यावर सुरुवातीला तो हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या प्रकरणी दोन महिन्यांनी परभणीच्या एका पोलीस अधिकाऱ्यासह २ पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुरुंगात सोमनाथला पोलिसांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला नसून त्याला श्वसनाचा दुर्धर आजार होता असा उल्लेख शवविच्छेदन अहवालात आहे. आधीपासूनच त्यांच्या शरीरावर काही जखमा होत्या, असे सांगितले. प्रत्यक्षात शवविच्छेदन अहवालातून मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. सोमनाथचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे आणि अहवालात मृत्यूला पोलिस जबाबदार असल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातही म्हटले आहे. न्यायालयात मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा पुराव्यातून सिद्ध झाल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश आज खंडपीठाने दिला.