CBSE- सीबीएसईच्या (CBSE) पाठ्यपुस्तकांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केवळ 68 शब्दांची जागा मिळाल्याच्या मुद्यावर विधानसभेत पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली. अपक्ष आ. सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा इतिहास नव्या पिढीपर्यंत योग्य स्वरूपात न पोहोचणे ही राज्य सरकारपासून शिक्षण विभागापर्यंत सर्वांचीच उदासीनता असल्याची टीका केली.
आ. सत्यजित तांबे म्हणाले की, सीबीएसईच्या अभ्यासक्रमात पहिली ते बारावी या 12 वर्षांच्या शैक्षणिक वर्षात केवळ 68 शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडला आहे. मात्र याच अभ्यासक्रमात देशातील इतर ठिकाणचे जे राजे आहेत त्यांच्याबद्दल विस्तृत माहिती लिहिलेली आहे. रयतेच्या राजाचे अनेक प्रसंग आपल्याला माहीत आहे. अरबी समुद्रातील छत्रपतींचे स्मारक असो किंवा गड किल्ल्यांचे संवर्धनासाठीच्या निधीबाबतचा प्रश्न असो, याबाबत सरकार उदासीन आहे. मागच्या अधिवेशनात आम्ही हाच मुद्दा मांडला होता. तेव्हा सांगितले होते की, दिल्लीला जाऊ, कॅबिनेट मंत्री या विषयाचा पाठपुरावा करत आहेत, केंद्रीय शिक्षण मंत्री यामध्ये लक्ष घालत आहेत. त्यानंतर शासन, विभाग, मंत्री सर्वांनाच या विषयाचा विसर पडला.
याशिवाय सीबीएससीच्या अभ्यासक्रमात केवळ इतिहासच नाही तर पर्यटन, भूगोल या विषयांमध्येही महाराष्ट्राला केंद्र ठेवून कोणत्याही प्रकारचा पुरेसा अभ्यासक्रम नाही. राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी सर्व शाळांमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू करण्याचे जाहीर केले. मात्र त्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा अतिशय कमी उल्लेख आहे. याच विषयावर सभागृहात पुन्हा चर्चा करावी लागते हे दुर्दैव आहे. यावर राज्यमंत्री पंकज भोयर यांनी माहिती दिली की,22 पानांचा राईस ऑफ मराठा हे प्रकरण आठवीच्या पुस्तकात समाविष्ट केले आहे. अजून हा भाग विस्तृत करण्याचा प्रयत्न आहे.मात्र यावर आ. तांबे यांनी सांगितले की, त्या प्रकरणात इतर इतिहास जास्त असून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत संक्षिप्त मजकूर आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांचे निधन
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अद्याप वैद्यकीय अहवाल नाही
शिर्डी साई संस्थानचे उत्पन्न ८५० कोटी; ३ हजार १९८ कोटींच्या ठेवी









