संजय शिरसाट यांचा दावा खरा ठरला! चंद्रहार पाटलांचा ठाकरेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’, शिंदे गटात करणार प्रवेश

Chandrahar Patil

Chandrahar Patil | डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करतएकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील यांनी सोशल मीडिया पोस्ट (Sद्वारे ही माहिती दिली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रहार पाटील शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी देखील याबाबत दावा केला होता. अखेर त्यांचा दावा खरा ठरला असून, चंद्रहार पाटील लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहे.

गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि सांगली लोकसभा मतदारसंघातूननिवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

सरकारसोबत जाण्याचा निर्णय का?

आपल्या पक्षप्रवेशाच्या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना चंद्रहार पाटील म्हणाले की, “राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना, मी बऱ्याच त्रुटी, अडचणी आणि गैरप्रकार अनुभवले आहेत. अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाजही उठवला आहे. परंतु, प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे.” म्हणूनच क्रीडा क्षेत्रात सुसूत्रता आणण्यासाठी आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी, त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हिंमत असेल तर थांबवा,’ असे चॅलेंज ठाकरेंच्या शिवसेनेला दिले होते. त्यावेळी चंद्रहार पाटील यांनी आपण अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेतच असल्याचे आणि पक्ष सोडण्याबाबत अजून निर्णय घेतला नसल्याचे म्हटले होते. आता अखेर चंद्रहार पाटील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.