राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात का? छगन भुजबळ म्हणाले…

Chhagan Bhujbal | राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्र येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. दोन्ही नेत्यांकडून सातत्याने याबाबत वक्तव्य केली जात आहेत. तसेच, दोन्ही पक्षांकडून सकारात्मक विधानं केली जात आहे. आता ठाकरे बंधू भविष्यात एकत्र निवडणूक लढवणार की नाही, याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केले आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता कमी असल्याचे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

ठाकरे बंधू एकत्र येतील असे वाटते का? या प्रश्नावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “शुभचिंतक म्हणून मला वाटते की दोन्ही ठाकरे गटांनी एकत्र यावे. यात काहीही गैर नाही. बाळासाहेबांसोबत मी 25 वर्षे काम केले आहे. राज ठाकरेंना मी लहानपणापासून पाहिले आहे. कलानगरमध्ये बाळासाहेब आणि वहिनीसाहेब सुट्टीच्या दिवशी राज ठाकरेंची जेवणासाठी वाट पाहायचे. दोघांचेही त्यांच्यावर खूप प्रेम होते.” एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, “मी मंत्री असतानाची एक घटना आठवते. राज्यसभेचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले होते. त्यांचा मृतदेह घेऊन आर. आर. पाटील आणि मी पुण्याला निघालो होतो. वाटेत रेल्वेत बॉम्बस्फोट झाले. त्यामुळे आर. आर. पाटील माघारी फिरले आणि मी एकटाच पुढे गेलो. तेव्हा मी 12 वर्षांनी दोन्ही भावांना फोन केला आणि त्यांना 7-8 दिवस काही न बोलण्याचा सल्ला दिला. माझा विचार होता की, 5-7 दिवसांनी राग कमी होतो आणि पुनर्विचार सुरू होतो. त्यांनी ऐकले, पण जे व्हायचे ते टळले नाही. राजकारणात काही गोष्टी ‘नाही म्हणजे नाहीच’ होणार. म्हणजे उद्धव आणि राज एकत्र येणार नाहीत. पुढे काय होईल ते मला माहीत नाही,” असे ते म्हणाले. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे व उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या पक्षांमध्ये युती होणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.