नाशिक- नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कुणी बुडवली यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यात मतभेद दिसून आले आहेत. भुजबळ यांनी बँकेच्या स्थितीबाबत बोलताना सर्वपक्षीय नेत्यांचा जबाबदार धरले आहे. या सर्वपक्षीय नेत्यांनीच बँक (Bank) बुडवल्याचा गंभीर आरोप केला होता. माणिकराव कोकाटे यांनी त्यांना प्रत्युत्तर देत असे म्हटले आहे की, भुजबळांचा गैरसमज झाला आहे.
भुजबळांच्या या वक्तव्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, बँकेच्या निवडणुका न होण्याच्या मताशी मी सुद्धा सहमत आहे. मात्र, सर्वपक्षीय नेत्यांनी बँक बुडवली, हा आरोप चुकीचा आहे. भुजबळांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. कोणत्याही राजकीय नेत्यांकडे बँकेचे थकित कर्ज नाही. काही निर्णय चुकले. काही कर्जे वसूल झाली नाहीत. त्यामुळे बँक अडचणीत आली आहे. परंतु राजकीय हेतूने आरोप करणे योग्य नाही. प्रशासक असावा. परंतु बँक राजकीय हस्तक्षेपाशिवाय चालावी, हीच माझी भूमिका आहे.
छगन भुजबळ काल म्हणाले होते की, बँकेच्या निवडणुका घेऊ नयेत. कारण दोषी नेत्यांची पोरेच पुन्हा निवडणुकीत उभी राहातात. शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहेत. रिझर्व्ह बँकेकडून सतत नोटीस येत आहेत. त्यामुळे प्रशासकांना मोकळे काम करू द्यावे.