Manikrao Kokate: ‘ही बाब आमच्यासाठी…’ रमी व्हिडिओ प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कृषीमंत्री कोकाटेंची कानउघाडणी

Manikrao Kokate Rummy Video

Manikrao Kokate Rummy Video: महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानभवनात रमी (Manikrao Kokate Rummy Video) खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चांगलेच चर्चेत आहे. कोकाटे यांनी यावर स्पष्टीकरण दिले असले तरीही विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत ही ही बाब भूषणावह नसल्याचे म्हटले आहे.

कोकाटेंच्या व्हायरल व्हिडिओवर फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मला वाटते की ही बाब अतिशय चुकीची आहे. विधानभवनात आपले कामकाज नसले तरीही, आपण त्या ठिकाणी गांभीर्याने बसणे आवश्यक आहे. एखाद्या वेळी असे होते की तुम्ही कागदपत्रे वाचता, इतर काही गोष्टी वाचता. पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही योग्य नाही. अर्थात कोकाटे यांनी रमी खेळत नसल्याचा खुलासा केला, अचानक ती जाहिरात समोर आली वगैरे सांगितले आहे, पण जरी त्यांनी जे काही सांगितले असले तरीही जे घडले आहे ते आम्हाला भूषणावह नाही.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ शेअर करत थेट कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

रोहित पवार यांनी व्हिडिओसह “जंगली रमी पे आओ ना महाराज” असा उपरोधिक संदेश दिला. त्यानंतर कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली.

कोकाटे यांनी आपल्या बाजूने स्पष्टीकरण देत म्हटले, “मी सभागृह तहकूब असताना यूट्यूबवर चालू अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण पाहत होतो. तेव्हा रमीची जाहिरात आपोआप सुरू झाली. मी ती वगळून पुढे गेलो, पण व्हिडिओ फक्त १८ सेकंदांचा आहे, तो अपूर्ण आहे.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितले की, कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेतील. या वक्तव्यानंतर कोकाटे यांच्यावर कारवाईचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता कोकाटेंचे मंत्रिपद जाणार की राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.