चंद्रपूर – चंद्रपूर उबाठा जिल्हाप्रमुख पद विकणे आहे, किंमत १० ते २५ लाख असा मजकूर असलेले वादग्रस्त बॅनर वरोरा आणि भद्रावती शहरात लावण्यात आल्याने राजकीय खळबळ उडाली. या बॅनरवर उबाठा खासदार संजय राऊत यांचा फोटो असून फशिवसेना असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याखाली मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू. संपर्क संजय राऊत असे लिहिल्याने चर्चांना अधिक उधाण आले आहे.
शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि स्थानिक असंतोषातून हा प्रकार घडल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे कालच उबाठाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. शिंदे हे संजय राऊत यांचे निकटवर्ती मानले जात होते. राऊत यांच्याच शिफारसीमुळे त्यांना जिल्हाप्रमुखपद मिळाले होते, अशी चर्चा होती. मात्र, त्यांच्या नियुक्तीला स्थानिक गटांमध्ये तीव्र विरोध होता. त्याच पार्श्वभूमीवर या बॅनरमधून पद विक्रीचा संजय राऊत यांच्यावर आरोप करण्यात आल्याची चर्चा आहे.