Devendra Fadnavis on Pakistani Nationals | केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा स्थगित केल्यानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra CM Devendra Fadnavis) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्यात जास्त काळ थांबलेल्या पाकिस्तानी नागरिकांवर (Pakistani citizens in Maharashtra) कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे (Pahalgam terror attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या हल्ल्यात 25 भारतीय नागरिक आणि 1 नेपाळी नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले.
माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “केंद्र सरकारने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तातडीने स्थगित केली आहे. आम्ही भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची यादी मागवली असून, त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की महाराष्ट्रात कोणताही पाकिस्तानी नागरिक 48 तासांपेक्षा जास्त थांबू नये. जर कोणी जास्त काळ थांबले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की, सर्व जिल्हा पोलीस युनिट्सना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. “आम्ही यावर सतत लक्ष ठेवणार आहोत आणि संबंधित नागरिकांना परत पाठवणार आहोत. कोणत्याही उल्लंघनाबाबत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे फडणवीस म्हणाले. त्यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्याशीही सखोल चर्चा केली असल्याचे सांगितले. “केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पावले उचलली जातील,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, सिंधू नदी कराराबाबत (Indus Waters Treaty) फडणवीस म्हणाले की, पाकिस्तानातील तीन-चार पाणी योजना सुरू असून, भारताने जर आवश्यक पाणी थांबवले, तर पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागतील.
रिपोर्टनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांच्या राज्यांतील पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्याचे आणि त्यांना तातडीने परत पाठवण्याचे आदेश दिले होते. सर्व प्रकारचे व्हिसा तातडीने रद्द करण्यात आले आहेत.