Dombivli Palava Flyover: डोंबिवलीतील पलावा उड्डाणपुल उद्घाटनानंतर अवघ्या 2 महिन्यातच खराब झाल्याने टीका होत आहे. 4 जुलै रोजी या पुलाचे उद्घाटन झाले होते. मात्र, आता पुलावर खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहे.
तब्बल 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी हा पूल सुरू झाला. मात्र, उद्घाटन होताच या पुलावर खड्डे, डांबर उखडणे आणि खराब पृष्ठभाग दिसू लागल्याने तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे नागरिकांनी बांधकाम खर्चावर आणि कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Condition of ₹250 Crore Palava Flyover, within 2 months after opening. Imagine the level of Corruption 😭 pic.twitter.com/7C232STxlq
— 🚨Indian Gems (@IndianGems_) September 10, 2025
कोट्यवधींचा पूल, पण दोन महिन्यांतच बिकट अवस्था
कल्याण-शीळ रस्त्यावर असलेला हा 562 मीटर लांबीचा पूल 72 कोटी रुपये खर्चून बांधला गेला आहे. या पुलामुळे कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगर येथील प्रवाशांना नवी मुंबईकडे जाणे सोयीचे होणार होते. परंतु, पूल सुरू झाल्यावर अवघ्या काही दिवसांतच तो खराब झाल्याने वाहनचालकांनी याला ‘स्किडींग झोन’ (skidding zone) असे नाव दिले आहे.
पुलावर उखडलेले डांबर, मातीचे थर आणि खराब सिमेंट दिसल्याने सोशल मीडियावर मोठी टीका सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर काही युजर्सनी ‘आमचे राजकारणी अंतराळ तंत्रज्ञान वापरून चंद्रावर गाडी चालवण्याचा अनुभव देत आहेत,’ अशी उपरोधिक टिप्पणी केली आहे. काही जणांनी थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
‘250 कोटींचा पूल दोन महिनेही टिकला नाही,’ असे म्हणत एकूण खर्चाच्या 20% रक्कमही बांधकामासाठी वापरली नसेल, असे आरोपही काही युजर्सनी केले आहेत.
४ जुलै रोजी उद्घाटन होऊन दोन तासातच खड्डे पडलेला पलावा पुल दोन महिन्यांनंतरही तसाच आहे. हे खड्डे म्हणजे बापबेट्यांच्या भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना आहे.#भ्रष्टाचार #भ्रष्टनाथ #बापबेटे #पलावापुल #टक्केवारी pic.twitter.com/sRZGblXBgO
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) September 9, 2025
MSRDC चे स्पष्टीकरण, तरीही वाद कायम
सोशल मीडियावरील संतप्त प्रतिक्रिया आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पुलावर खड्डे पडलेले नाहीत. डांबराचे काम झाल्यावर सततच्या पावसामुळे डांबर पावडर बाहेर आली आणि त्यामुळे खड्डे असल्यासारखे दिसत आहे.
मात्र, MSRDC च्या या स्पष्टीकरणानंतरही नागरिकांचा राग शांत झालेला नाही आणि या पुलावरून वाद सुरूच आहे. मनसे नेते राजू पाटील यांनीही या पुलाचा व्हिडिओ शेअर करत टीकेची झोड उठवली आहे.
हे देखील वाचा – Aaditya Thackeray : ‘BCCI पैशांसाठी खेळत आहे का?’; भारत-पाक सामन्यावरून आदित्य ठाकरेंची जोरदार टीका