Dr Baba Adhav Death : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक आणि कष्टकरी तथा श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ डाॅ. बाबा आढाव यांचे सोमवारी (8 डिसेंबर) रात्री सुमारे 8.25 वाजता पुण्यात निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील सामाजिक आणि श्रमिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
फुफ्फुसात बिघाड झाल्यामुळे डाॅ. बाबा आढाव यांच्यावर गेल्या दहा दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर (Artificial Respiration) ठेवण्यात आले होते. मात्र, वयोमानामुळे उपचारांना त्यांची प्रकृती पुरेसा प्रतिसाद देत नव्हती आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी शीला आढाव, असीम आणि अंबर हे दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
पार्थिव देह आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
वैद्यकीय व्यवसाय सोडून समाजकार्यात
डाॅ. बाबा आढाव यांचा जन्म 1 जून 1930 रोजी पुण्यात झाला. रसायनशास्त्राची पदवी संपादन करून त्यांनी आयुर्वेद महाविद्यालयातून 1952 मध्ये पदवी मिळवली आणि वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.
भाऊसाहेब रानडे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे आणि राम मनोहर लोहिया यांच्या समाजवादी सिद्धांतांनी प्रेरित होऊन त्यांनी राष्ट्र सेवा दलात कार्य केले. 1966 मध्ये त्यांनी परिचारिका म्हणून काम करणाऱ्या शीला गरुड यांच्याशी विवाह केला.
राज्यात पडलेल्या दुष्काळादरम्यान हमालांच्या वाईट परिस्थितीमुळे व्यथित झालेल्या बाबांनी महागाई आणि अन्नधान्याच्या रेशनिंगविरुद्ध सत्याग्रह केला आणि तीन आठवडे तुरुंगवास (Jail) भोगला. यानंतर त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी आपला वैद्यकीय व्यवसाय बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
संघर्ष आणि वैचारिक वारसा
बाबा आढाव यांनी आपले 70 वर्षांचे सामाजिक जीवन महिला, समता, कष्टकरी आणि जातीचा मुद्दा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर लढा देण्यात व्यतीत केले.
हमाल पंचायत: त्यांनी हमालांना संघटित करून हमाल पंचायत ही असंघटित कामगारांची पहिली संघटना स्थापन केली. त्यांनी शेतमजूर, हमाल आणि रिक्षाचालक यांच्या न्याय हक्कांसाठी आजीवन संघर्ष केला.
सत्यशोधकी विचार: त्यांच्यावर महात्मा फुले आणि साने गुरुजींच्या सत्यशोधकी विचारांचा खोलवर प्रभाव होता.
एक गाव एक पाणवठा: जातीय भेदभावाला विरोध करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर एक गाव एक पाणवठा ही चळवळ यशस्वीरित्या चालवली.
विज्ञान आणि समाज: समाजात मूलभूत स्वरूपाचे बदल घडवण्यासाठी संघर्ष करताना त्यांनी विज्ञानाची कास धरली.
राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली
डाॅ. बाबा आढाव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह सर्व स्तरांतून तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले आहे.









