Home / महाराष्ट्र / फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मराठा आंदोलकांना मदत करता का? एकनाथ शिंदे म्हणाले…

फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मराठा आंदोलकांना मदत करता का? एकनाथ शिंदे म्हणाले…

Eknath Shinde on Maratha Reservation

Eknath Shinde on Maratha Reservation: . मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर सुरू आहे. या आंदोलनावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

‘मी खुलेआम करतो, लपूनछपून नाही’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करत असल्याच्या चर्चांवर एकनाथ शिंदे चांगलेच संतापले. याविषयीच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, “मी सगळं खुलेआम करतो. लपून छपून, बंद दाराआड काही करत नाही,”, असे म्हणत त्यांनी हे आरोप फेटाळून लावले.

त्यांनी 2019 च्या सत्तासंघर्षावर भाष्य करत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. “जे पाप पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी केले होते, जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला होता, ते दुरुस्त करण्याचे काम आम्ही 2022 मध्ये केले,” असे शिंदे म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील सरकार आम्ही आणले आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वजण ताकदीने सर्व प्रसंगांना तोंड देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आंदोलनासाठी मराठा समाजाला मुंबईत का यावे लागले, असा सवाल विचारत एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवले होते. यावर बोलताना शिंदे म्हणाले, “राज ठाकरे यांनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे होती.” 2019 मध्ये तत्कालीन सरकारने न्यायालयात मराठा आरक्षण का टिकवले नाही, हा प्रश्न राज ठाकरे यांनी त्यांना विचारायला हवा होता, असा टोला त्यांनी लगावला. आमच्या सरकारने 10 टक्के आरक्षण दिले आणि न्या. शिंदे समिती स्थापन करून कुणबी नोंदी शोधल्या, ज्याचा लाभ मराठा समाजाला मिळत आहे, असेही शिंदे म्हणाले.

‘सरकार योग्य निर्णय घेण्यास समर्थ’

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगताना शिंदे म्हणाले की, “विरोधक समाजामध्ये संभ्रम आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.” सध्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाली आहे. सरकार म्हणून आम्ही कायदेशीर बाबी तपासून योग्य तो निर्णय घेऊ. मनोज जरांगे पाटील यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

राज ठाकरे कुचक्या कानाचे ! मनोज जरांगेंचा हल्लाबोल

खानचंदानींच्या मृत्यूला उबाठा नेता जबाबदार! पतीचा पत्रकार परिषदेत आरोप

मराठा समाज मागासलेला नाही! चंद्रकांत पाटलांचे विधान वादात