Election 2025 : राज्यात निवडणुकांची जोरदार धामधूम सुरु असल्याचे दिसत आहे. राज्यातील एकूण २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण १४३ सदस्यपदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी ७:३० वाजल्यापासून ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडणार आहे. यासगळ्या पार्शवभूमीवर, नांदेडमधील धर्माबाद येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या धर्माबादमध्ये (Dharmabad) भाजपा कार्यकर्त्यांनी मतदारांना डांबून ठेवल्याचा खळबळजनक आरोप मतदारांकडूनच करण्यात आला आहे.
आज धर्माबाद पालिकेसाठी मतदान (Dharmabad Municipal Council) सुरु आहे. सकाळपासून पैशांचे आमिष दाखवून मतदारांना येथे बोलावून घेण्यात आल्याचा दावा नागरिकांनी केला. पैसे देतो मग बाहेर जाऊन मतदान करा असे त्यांना सांगण्यात आले होते. या मतदारांपैकी काही महिलांनी सांगितले की आधी आम्हाला एक हजार देतो म्हणून सांगितले, मग ३ हजार देतो म्हणाले आणि आम्हाला थांबवून ठेवले.जे मतदान भाजपाला होणार नाही अशा मतदारांना प्रलोभन दाखवून मतदान करू नका अशी विनंती भाजपा करत होते अशी चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
अहिल्यानगरातील कोपरगावमध्येही गोंधळाची स्थिती-
अहिल्यानगरमधील कोपरगाव येथील मतदान केंद्रावर देखील मोठा गोंधळ झाल्याचं समोर आले आहे. यावेळी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये यावरून बाचाबाची झाली असून मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी दबाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. आरोप करत असताना उपस्थित पोलिसांसमोरच दोन गटांमध्ये मोठी बाचाबाची झाली.
पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून लांब नेले. यानंतर मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांध्येही शाब्दिक बाचाबाची झाल्याचं समोर आले. या सगळ्या प्रकारामुळे कोपरगावमधील एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर काहीकाळ तणावाचे वातावरण असल्याची माहिती आहे.
भुसावळमध्येही मतदान केंद्रावर पोलीस आणि निवडणूक केंद्रावरील कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वादावाद –
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील प्रभाग क्रमांक ११ ब मधील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर पोलीस आणि निवडणूक केंद्रावरील कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. स्ट्रॉंगरूममधून ईव्हीएम मशीन आणि मतदान केंद्रावरील साहित्य तसेच मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी खाजगी वाहन देण्यात आली आहेत. त्यावर मतदान केंद्रावरील परवानगी पत्रसुद्धा लावण्यात आले आहे. मात्र मतदान सुरू झाल्यानंतर सदर वाहन कर्मचारी मतदान केंद्रातून काही साहित्य आणण्यासाठी ने आण करत असल्याने पोलिसांनी कर्मचाऱ्यांना अडवत मतदान केंद्रावरच सदर वाहन लावण्याच्या सूचना केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण होते.
हे देखील वाचा – Eknath Shinde : ‘लाडक्या बहिणींना योग्य वेळी 2100 रुपये देणारच…’; एकनाथ शिंदेंचा मोठा शब्द









