Gadchiroli Naxal Encounter- छत्तीसगड (Chhattisgarh) सीमेलगत असलेल्या भामरागड (Bhamragad) तालुक्यातील कोपर्शी गावाजवळील जंगलात पोलीस (Police) व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी (Gadchiroli Naxal Encounter) ठार झाले. मृतांमध्ये एका पुरुषासह तीन महिलांचा समावेश आहे.
२५ ऑगस्ट रोजी गट्टा दलम व कंपनी क्रमांक १० चे नक्षलवादी पोलिसांवर घातपात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-६० दलाचे १९ जवान, केंद्रीय राखीव दल व जलद प्रतिसाद दलाची दोन पथके या भागात रवाना करण्यात आली होती. मुसळधार पावसातही पोलिसांनी सलग दोन दिवस नक्षलविरोधी मोहीम राबविली. त्यानंतर नक्षल्यांनी पोलिसांवर अचानक गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर देत कारवाई केली. सुमारे आठ तास सुरू राहिलेल्या या चकमकीनंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता, चार नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांना आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक एसएलआर रायफल, दोन इन्सास रायफल, एक ३०३ रायफल आणि अन्य साहित्य जप्त केले. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.