Andheri Gokhale Bridge | मुंबईतील अंधेरी (Andheri) भागातील पुनर्रचना केलेला गोपाळ कृष्ण गोखले पूल (Gopal Krishna Gokhale Bridge) पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झाला. नुकतेच, या पुलाचे लोकार्पण पार पडले. हा पूल सात वर्षांपूर्वी वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोखले पूल म्हणून ओळखला जाणारा हा पूल पश्चिम उपनगरात पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत करेल. 2018 मध्ये रेल्वे रुळांवरचा या पुलाचा काही भाग कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला होता आणि तीन जण जखमी झाले होते. यामुळे प्रशासनाला पुलावरील वाहतूक बंद करावी लागली आणि मुंबईतील सर्व रेल्वे पुलांचे सुरक्षा ऑडिट करावे लागले होते.
जुन्या संरचनेला पाडून नवीन पूल बांधण्याच्या या पुनर्रचना प्रकल्पाला मार्च 2021 मध्ये दोन्ही बाजूंच्या रस्त्यांच्या कामासह सुरुवात झाली. रेल्वे रुळांवरील बांधकाम एप्रिल 2023 मध्ये सुरू झाले.
पहिला टप्पा, ज्यामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे हलक्या वाहनांना जाण्याची परवानगी देण्यात आली होती, तो गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये खुला करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकल्पात अनेक अडचणी आल्या.
अंधेरी स्टेशनजवळ बांधलेला पुनर्रचित पूल दशकांपूर्वी बांधलेल्या बर्फीवाला उड्डाणपुलाच्या (Barfiwala Flyover) उत्तर बाजूला जुळत नसल्याचे समोर आल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेवर (BMC) जोरदार टीका झाली. हा मुद्दा राजकीय वादाचा विषयही बनला होता.
त्यानंतर पालिकेने तज्ञांच्या मदतीने उड्डाणपुलाचा काही भाग उचलून गोखले पुलाशी जुळवला. बर्फीवाला उड्डाणपुलाची उत्तर बाजू जुलै 2024 मध्ये पुन्हा सुरू करण्यात आली आणि आता दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याने संपूर्ण गोखले पूल पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे.
मुंबईतील अंधेरी पूर्व – पश्चिम भागांना जोडणाऱ्या नव्या ‘गोपाळ कृष्ण गोखले पुला’चे लोकार्पण केले. अत्यंत महत्वाच्या आणि बहुप्रतिक्षित अशा या पुलामुळे अंधेरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. या पुलामुळे पूर्वेकडील वीरा देसाई रोड, अंधेरी स्टेशन, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि… pic.twitter.com/HdZV1Oe7uk
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 11, 2025
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या हस्ते पुलावर एका सार्वजनिक कार्यक्रमात या पुलाचे उद्घाटन झाले. त्यांनी गोखले पुलाच्या बांधकामादरम्यान आलेल्या आव्हानांमुळे याला “अभियांत्रिकीचे अद्वितीय उदाहरण” असे म्हटले आहे.
बीएमसीनुसार, वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI) आणि आयआयटी मुंबईच्या (IIT Bombay) तांत्रिक तज्ञांच्या देखरेखेखाली जॅकचा वापर करून बर्फीवाला उड्डाणपुलाच्या उत्तर आणि दक्षिण बाजू उचलण्यात आल्या आणि गोखले पुलाच्या रस्त्यांशी जुळवण्यात आल्या. बीएमसीने सांगितले की, पूर्णपणे कार्यान्वित झालेला हा पूल अंधेरी पूर्वमधील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपासून ते अंधेरी पश्चिममधील स्वामी विवेकानंद मार्गापर्यंत तेली गल्लीमार्गे कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल.
या पुलाची एकूण लांबी 511 मीटर आणि रुंदी 27 मीटर आहे, ज्यात दोन्ही बाजूंना पादचारी मार्ग आणि 3+3 लेनचा वाहनांसाठी मार्गिका आहे. रेल्वे रुळांवरील पुलाचा भाग 90 मीटर लांब आहे.