Gokul Milk Price: गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्थांना गणेशोत्सवाचे खास गिफ्ट दिले आहे. गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाय आणि म्हैस दुधाच्या खरेदी दरात (Gokul Milk Price) प्रतिलिटर 1 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ 1 सप्टेंबरपासून लागू होणार असून, याचा फायदा सुमारे 4.5 ते 5 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
गोकुळने गायीच्या दुधाचा खरेदी दर 32 रुपयांवरून 33 रुपये प्रतिलिटर केला आहे, तर म्हैस दुधाचा खरेदी दर 50.50 रुपयांवरून 51.50 रुपये प्रतिलिटर झाला आहे.
या दरवाढीमुळे गोकुळच्या दूध उत्पादकांना (Gokul Milk Price) दरमहा सुमारे 4.5 ते 5 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल. या दरवाढीनंतरही गोकुळच्या विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
दूध खरेदी दरासोबतच गोकुळने इतरही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. प्राथमिक दूध संस्थांच्या मागणीनुसार, त्यांच्या इमारत अनुदानात 8 ते 10 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संस्थेच्या दूध संकलनानुसार अनुदानात वाढ होऊन ते आता 1 ते 100 लिटरसाठी 40 हजार रुपये, 101 ते 200 लिटरसाठी 45 हजार रुपये, 301 ते 500 लिटरसाठी 55 हजार रुपये आणि 501 लिटरहून अधिकसाठी 60 हजार रुपये असे असणार आहे.
याशिवाय, दूध संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर दरात 5 पैशांची वाढ करण्यात आली आहे. यापुढे त्यांना प्रतिलिटर 0.65 पैशांऐवजी 0.70 पैसे मिळतील. गोकुळने मुक्त गोठा योजनेच्या निकषांमध्येही बदल केला आहे. यापूर्वी किमान 5 जनावरांच्या गोठ्यांना अनुदान मिळत होते, ती अट आता शिथिल करून 4 जनावरे असलेल्या गोठ्यालाही अनुदान दिले जाईल.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
‘मराठा समाजाचे बांधव….’; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया; म्हणाला…