मुंबई- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) हरित कर्जरोखे (green bond) इश्यू केले. पीसीएमसी ही कॅपिटल मार्केटमधून निधी उभारणारी देशातील पहिली महापालिका ठरली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईच्या Bombay Stock Exchange मधील (BSE) आंतरराष्ट्रीय सभागृहात पीसीएमसीचा हरित कर्जरोखे लिस्टिंग हा कार्यक्रम पार पडला. यावेळी CM Fadanvis बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार महेश लांडगे, जगताप, अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त भूषण गगराणी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग, अप्पर मुख्य सचिव असिम गुप्ता, प्रधान सचिव डॉ. के. गोविंदराज, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक सुंदरम रामामूर्ती हे उपस्थित होते.
PCMC ने जारी केलेल्या हरित कर्जरोख्यांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. गुंतवणूकदारांनी भरभरून गुंतवणूक केली. कर्ज रोखे खुला झाल्या नंतर याद्वारे काही मिनिटातच १०० कोटीची गुंतवणूक करण्यात आली. त्यानंतर ५ पटीने गुंतवणूकदारांमध्ये वाढ झाली. यावरून हरित कर्ज रोख्यांवरील गुंतवणूकदारांचा विश्वास दिसतो. या रोख्यांचा कालावधी ५ वर्षांचा असून त्यासाठी ७.८५ टक्के स्पर्धात्मक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. share market मध्ये कर्जरोखे लिस्टिंग करण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. कॉर्पोरेट अटी-शर्तींची पूर्तता करताना लिस्टिंगची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पायाभूत सोयी-सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येईल. ही कामे हरित पद्धतीची, पर्यावरणासाठी पूरक आणि शाश्वत उत्क्रांतीची असणार आहेत. केंद्राकडूनही हरित कर्ज रोखे इश्यू केल्यामुळे २० कोटींचे अनुदानही पालिकेला प्राप्त झाले आहे, असेही फडणवीस म्हणाले. महापालिकेच्या संपूर्ण यंत्रणेचे फडणवीसांनी अभिनंदन केले.
