मुंबई – एखाद्या महिलेला तिच्या काळ्या रंगावरून टोमणे मारणे किंवा ती चांगला स्वयंपाक करत नाही म्हणून तिला सुनावणे, हे भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-अ (छळवणूक) आणि कलम ३०६ (आत्महत्येसाठी प्रवृत्त) अंतर्गत गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिला आहे. २७ वर्षांपूर्वीच्या आत्महत्येप्रकरणी दोषी ठरवलेल्या पतीची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने हा निर्णय दिला.
सातारा जिल्ह्यातील एका विवाहित महिलेने जानेवारी १९९८ मध्ये विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide)केली होती. मृत महिलेच्या नातेवाइकांनी दिलेल्या जबाबानुसार, तिचा पती तिला काळ्या रंगावरून टोमणे मारायचा. ती व्यवस्थित स्वयंपाक करत नाही यावरूनही वाद घालत असे. याच आधारावर सातारा सत्र न्यायालयाने त्या व्यक्तीला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या एकलपीठाने या प्रकरणावर सुनावणी घेतली.
न्यायालयाने स्पष्ट केले की, अशा प्रकारचे टोमणे हे वैवाहिक जीवनातील सामान्य घरगुती वादविवादांचे स्वरूप असून, त्यातून गंभीर छळ किंवा आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा हेतू दिसून येत नाही. त्यामुळे हे कृत्य भारतीय दंड संहितेवरील कलमांखाली गुन्ह्याच्या श्रेणीत बसत नाहीत. त्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करत आहोत.