Jalgaon News : जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यात सुलेमान पठाण (21) या तरुणाची मॉब लिंचिंगमध्ये हत्या झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक केली असून, त्यांच्यावर मॉब लिंचिंग आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुलेमान हा जामनेरच्या एका कॅफेमध्ये एका मुलीसोबत बसलेला असताना, काही लोकांनी त्याचे अपहरण केले आणि त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुलेमानचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपींनी सुलेमानचा मृतदेह त्याच्या बेटावद गावातील घरासमोर फेकून दिला आणि त्याच्या आई-वडिलांना व बहिणीलाही मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत बीबीसी मराठीने वत्त दिले आहे.
कुटुंबीयांची ‘मकोका’ची मागणी
सुलेमानच्या नातेवाईकांनी सुरुवातीला मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत रास्ता रोको आंदोलन केले. आरोपींवर ‘मकोका’ लावण्याची मागणी त्यांनी केली. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी समजूत काढल्यानंतर आंदोलन शांत झाले.
सुलेमानचे मामा साबीर खान म्हणाले, “सुलेमान पोलीस भरतीच्या फॉर्मची माहिती घेण्यासाठी जामनेरला आला होता. पोलीस स्टेशनजवळून त्याचे अपहरण करून त्याला जंगलात नेऊन 6-7 तास मारहाण केली.” सुलेमानच्या आजोबांनी आरोपींवर कठोर कारवाई करून न्याय देण्याची मागणी केली आहे.
पोलिसांची भूमिका
या प्रकरणी जळगावच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, 11 तारखेला एका 17 वर्षांची मुलगी आणि सुलेमान एका कॅफेत बसले होते, त्यावेळी काही तरुणांनी त्यांना तिथून नेऊन सुलेमानला मारहाण केली.
आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली असून, इतरांचा शोध सुरू आहे. काही जणांनी विशेष तपास पथकाची (SIT) मागणी केली आहे, त्यावर लवकरच विचार केला जाईल. शवविच्छेदन अहवाल अजून आलेला नसला तरी, डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
AIMIMपक्षाचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनीही या घटनेचा निषेध करत, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ही घटना प्रेमप्रकरणातून घडल्याची चर्चा असली तरी, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.