Jayant Narlikar Passes Away | जागतिक स्तरावर ख्याती असलेले ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान प्रसारकआणि मराठी साहित्य व विज्ञान क्षेत्रातील आधारस्तंभ डॉ. जयंत विष्णू नारळीकर (Dr. Jayant Vishnu Narlikar) यांचे आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञानविश्वातशोककळा पसरली आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. नारळीकर यांची प्राणज्योत आज पहाटे त्यांच्या राहत्या घरी मालवली. त्यांना कोणतेही मोठे आजारपण नव्हते, परंतु वयोमानानुसार त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या जाण्याने वैज्ञानिक, साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी तारा निखळला आहे.
डॉ. नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे झाला होता. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ (mathematician) आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख होते, तर त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या.
त्यांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. त्यानंतर त्यांनी विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात गेले, जिथे त्यांनी B.A., M.A. आणि Ph.D. पदव्या मिळवल्या. त्यांनी खगोलशास्त्रातील टायसन मेडल , स्मिथ पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार व शिष्यवृत्त्या प्राप्त केल्या होत्या.
डॉ. नारळीकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक अद्वितीय शास्त्रज्ञ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडून जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले. खगोलभौतिकी क्षेत्रात त्यांचे चार दशकांहून अधिक काळ महत्त्वपूर्ण संशोधन कार्य होते.
केवळ वैज्ञानिक संशोधनच नव्हे, तर डॉ. नारळीकर यांनी विज्ञानकथांच्या माध्यमातून आणि सोप्या भाषेत विज्ञान समजावून सांगणाऱ्या पुस्तकांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्याचे मोठे कार्य केले. ‘चला जाऊ अवकाश सफरीला’ यांसारख्या त्यांच्या विज्ञान कथा मुलांमध्ये विशेष लोकप्रिय होत्या. ‘यक्षांची देणगी’ या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. त्यांची ‘आकाशाशी जडले नाते’ या पुस्तकालाही खूप प्रसिद्धी मिळाली.
विज्ञान प्रसारणातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यात 1965 मध्ये पद्मभूषण, 2004 मध्ये पद्मविभूषण आणि 2010 मध्ये महाराष्ट्र भूषणयांसारख्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांचा समावेश आहे. याशिवाय त्यांना भटनागर पुरस्कार, M.P. बिर्ला पुरस्कार आणि युनेस्कोचा कलिंग पुरस्कार देखील मिळाला होता. 2021 मध्ये नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे देखील ते अध्यक्ष होते. त्यांच्या ‘चार नगरांतले माझे विश्व’ या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.