Kalyan News: कल्याणमध्ये मराठी तरुणीला बेदम मारहाण; परप्रांतीय गोकुळ झा या गुंडाला पोलिसांनी केले अटक

Kalyan Marathi Girl Assault Case

Kalyan Marathi Girl Assault Case: कल्याण शहरातील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला परप्रांतीय व्यक्तीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरल्याने संतापाची लाट उसळली. त्यानंतर अखेर मानपाडा पोलिसांनी मुख्य आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा यांना नांदिवली भागातून अटक केले आहे.

तरूणीने सांगितला घटनाक्रम

कल्याणमधील एका खासगी बाल चिकित्सालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या सोनाली या तरुणीला गोकुळ झा या गुंडाने अमानुष मारहाण केली. गोकुळ झा हा एका रुग्णासह रुग्णालयात आला होता आणि त्याला तातडीने आत जाण्याची घाई होती. सोनालीने त्याला रांगेचा नंबर नसल्याने दहा मिनिटे थांबण्यास सांगितले. यावर गोकुळ चिडला आणि त्याने शिवीगाळ सुरू केली.

सोनालीने आपल्या वरिष्ठांना याची माहिती दिली आणि त्याला शांतपणे बोलण्यास सांगितले. मात्र, यामुळे गोकुळ आणखी संतापला. त्याने सोनालीचे केस पकडून तिला जमिनीवर आपटले आणि फरफटत दरवाजापर्यंत नेले.

या तरूणीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या मारहाणीमुळे सोनालीच्या मानेला, छातीला आणि पायांना गंभीर दुखापत झाली आहे. तिला मान हलवताना तीव्र वेदना होत आहेत. डॉक्टरांनी अर्धांगवायूची शक्यताही व्यक्त केली आहे.

कोण आहे गोकुळ झा?

तपासात गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वी कल्याण, कोळशेवाडी आणि उल्हासनगर परिसरात दरोडे आणि मारहाणीचे तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. चार दिवसांपूर्वीच तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता.

नांदिवली भागात तो फेरीवाल्यांकडून जबरदस्तीने हप्ते गोळा करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी त्याने एका प्रकरणात हत्याराने मारहाण केली होती, तर दुसऱ्या घटनेत ट्रक चालकाला मारहाण केल्याचा आरोप आहे.