मुंबई- स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात (Stand-up comedian Kunal Kamra) भाजपा (BJP) आमदार प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला होता. या हक्कभंगाच्या नोटिशीला आता कामराने उत्तर दिले आहे. तो म्हणाला की, नेत्यांनी जे शब्द स्वतःच्या भाषणात वापरले त्यांचाच वापर करून मी गाणे गायले. तर मी गायलेले गाणे आक्षेपार्ह ठरवून माझ्यावरच कारवाई का?
कुणाल कामराने पाठवलेल्या उत्तरात म्हटले आहे की, लोकशाही संस्थेच्या योग्य कार्याचे रक्षण करण्यासाठी विशेषाधिकार कार्यवाही सुरू करण्याचा कायदेमंडळाला अधिकार आहे. परंतु फौजदारी अवमानासाठी शिक्षा करण्याच्या न्यायालयाच्या अधिकाराप्रमाणेच (ज्याची मला काहीशी ओळख आहे), संसदीय विशेषाधिकाराचा वापर तेव्हाच केला जाऊ शकतो जेव्हा वादग्रस्त कृती राज्याच्या संबंधित संस्थेच्या कामकाजात स्पष्टपणे आणि लक्षणीयरीत्या हस्तक्षेप करत असेल. माझ्या गाण्यामुळे मी कुठल्याही प्रकारे विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप केला नाही. फक्त टीका, व्यंग आणि कला वापरून माझे मत व्यक्त केले आहे. या गाण्याने मी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचा अवमान केला असेन, तर माझा हेतू सभागृहाचा अवमान किंवा तिथल्या सदस्यांना चिथावणी देण्याचा नव्हता. माझ्या विरोधात असलेली कारवाई ही जाणूनबुजून आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असून त्यातून माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे. नेत्यांनी जे शब्द स्वतःच्या भाषणात वापरले त्याचाच वापर करून मी गाणे गायले, हे गाणे आक्षेपार्ह मानून माझ्यावरच कारवाई का?