Kolhapur Circuit Bench: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांनी अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan Gavai) यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच (Kolhapur Circuit Bench) इमारतीचे उद्घाटन पार पडले.
यामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील लोकांना आता जलद न्याय मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांची प्रमुख उपस्थिती होती. या नव्या खंडपीठाच्या स्थापनेमुळे मुंबई उच्च न्यायालयाची आता मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोव्यानंतर पाचवी शाखा सुरू झाली आहे.
ऐतिहासिक इमारतीला नवी झळाळी
कोल्हापूर शहराच्या मध्यभागी, सीपीआर (CPR) समोर असलेली जिल्हा न्यायालयाची ही इमारत 1874 साली बांधली गेली होती. जिल्हा न्यायालयाचे काम कसबा बावडा येथील नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्यावर ही इमारत बंद पडली होती.
मात्र, राज्य सरकारने या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ₹46 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, ज्यामुळे या हेरिटेज इमारतीला (Heritage Building) नवी ओळख मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ एका महिन्यात इमारतीची डागडुजी करून संपूर्ण परिसराचा कायापालट केला आहे.
नव्या खंडपीठाचे कामकाज कसे चालेल?
हे खंडपीठ सार्वजनिक सुट्ट्या वगळून आठवड्यातील सर्व दिवस कार्यरत राहील. कामकाजाचे पहिले सत्र सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 पर्यंत, त्यानंतर 1.30 ते 2.30 पर्यंत मध्यंतराची सुट्टी आणि दुसरे सत्र 2.30 ते 4.30 या वेळेत चालेल. या खंडपीठात एक डिव्हिजनल बेंच आणि दोन सिंगल बेंच असणार आहेत.
कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचची मागणी गेल्या 20 वर्षांहून अधिक काळापासून केली जात होती. अनेक आंदोलने आणि पाठपुराव्यानंतर हे स्वप्न साकार झाले आहे. न्यायदानाच्या प्रक्रियेतील ही सुलभता पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक आणि वकिलांसाठी एक मोठी उपलब्धी आहे. तसेच यामुळे कायद्याचे अभ्यासक, वकील आणि विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील.