Home / महाराष्ट्र / थेट रेल्वेतून घेऊन जा गाडी; कोकण रेल्वेने ‘रो-रो’सेवेसाठी वाढवली अंतिम मुदत

थेट रेल्वेतून घेऊन जा गाडी; कोकण रेल्वेने ‘रो-रो’सेवेसाठी वाढवली अंतिम मुदत

Konkan Railway Ro-Ro Service

Konkan Railway Ro-Ro Service: प्रवाशांच्या मागणीमुळे कोकण रेल्वेने (Konkan Railway) महत्त्वाचा निर्णय घेत रो-रो सेवेची मुदत वाढवली आहे. कोलाडहून (Kolad) नांदगाव रोड आणि वेर्णा येथे गाड्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या रोल-ऑन/रोल-ऑफ (Ro-Ro) सेवेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे.

यापूर्वी नोंदणीची अंतिम तारीख 18 ऑगस्ट होती. पण अनेक प्रवाशांनी अधिक वेळ देण्याची विनंती केल्यामुळे कोकण रेल्वेने ही मुदत वाढवून 20 ऑगस्टपर्यंत केली आहे. त्यामुळे इच्छुक प्रवाशांना आता नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी मिळाला आहे.

गणपतीमध्ये सुट्टीला मुंबईवरून कोकणात जाणारे प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकतात. यामुळे वाहनांची रेल्वेच्या माध्यमातून सुरक्षित आणि सुलभ वाहतूक करता येते. यामुळे रस्त्यांवरील गर्दी (Traffic) कमी होते आणि प्रवाशांसाठी प्रवास करणे अधिक सोयीचे होते.

कोकण रेल्वेने विनंती केली आहे की ज्या ग्राहकांना आपल्या वाहनांची वाहतूक करायची आहे, त्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा आणि आपली नोंदणी लवकर पूर्ण करावी. नोंदणीच्या अटी आणि शर्ती तसेच नोंदणी प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी, ग्राहक कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट www.konkanrailway.com ला भेट देऊ शकतात.

‘रो-रो’ सेवेची वैशिष्ट्ये आणि भाडे

‘रो-रो’ कार सेवेसाठी खास तयार करण्यात आलेल्या रेकमध्ये एका फेरीत 40 गाड्या नेता येतील. 20 वॅगनवर प्रत्येकी दोन गाड्या चढवल्या जातील, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे. कोलाड येथून 23 ऑगस्टला आणि वेर्णा येथून 24 ऑगस्टला या सेवेची सुरुवात होईल.

या ‘रो-रो’ सेवेद्वारे आपली कार नेण्यासाठी वाहनमालकांना वस्तू आणि सेवा करासह 7875 रुपये मोजावे लागतील. आरक्षणाच्या वेळी सुरुवातीला 4000 रुपये भरावे लागतील, तर उर्वरित रक्कम प्रवासाच्या दिवशी द्यावी लागेल. प्रत्येक कारसोबत जास्तीत जास्त तीन व्यक्तींना संलग्न तृतीय श्रेणी वातानुकूलित किंवा द्वितीय श्रेणी आसनाच्या डब्यातून प्रवास करण्याची परवानगी असेल. यासाठी प्रत्येक व्यक्तीला निर्धारित भाडे द्यावे लागेल, जे तृतीय श्रेणी वातानुकूलितसाठी 935 रुपये आणि द्वितीय श्रेणी आसनासाठी 190 रुपये असेल.

आरक्षण प्रक्रिया आणि प्रवासाचे वेळापत्रक

पुरेसे आरक्षण न झाल्यास (16 पेक्षा कमी गाड्यांसाठी बुकिंग झाल्यास), संबंधित फेरी रद्द केली जाईल आणि नोंदणी शुल्क पूर्णपणे परत केले जाईल.

ज्यांना या सेवेचा लाभ घ्यायचा आहे, ते कोकण रेल्वेच्या बेलापूर किंवा वेर्णा येथील कार्यालयात रोख किंवा युपीआयद्वारे पैसे भरून आरक्षण करू शकतात. ही सेवा कोलाड ते वेर्णा दरम्यान असेल.

कोकण रेल्वेचा अभिनव उपक्रम

कोकण रेल्वेने 1999 मध्ये ट्रकसाठी ‘रो-रो’ सेवा सुरू करून भारतात या संकल्पनेचे नेतृत्व केले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, खासगी गाड्यांसाठी ही सेवा प्रथमच सुरू केली जात आहे.

कोकण पट्ट्यातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक असलेल्या गणपती उत्सवादरम्यान, मुंबई आणि राज्यातील इतर भागांतून लाखो लोक विविध वाहतूक साधनांनी प्रवास करतात. मात्र, राष्ट्रीय महामार्गाच्या खराब स्थितीमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत कोकण रेल्वेची ही नवीन सेवा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.