Kunal Kamra Controversy | प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादात अडकला आहे. आता कुणाल कामराला आणखी एक धक्का बसला आहे. देशातील प्रमुख ऑनलाईन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या बुक माय शो ने (BookMyShow) त्यांच्या वेबसाइटवरून कामराचे सर्व शो हटवले आहे. तसेच, कंपनीच्या कलाकारांच्या यादीतून देखील त्याचे नाव काढण्यात आले आहे.
शिवसेनेचे (शिंदे गट) (Shiv Sena) युवा नेते राहुल एन. कनाल (Rahul Kanal) यांनी BookMyShow ला पत्र लिहून कामराच्या शोचे आयोजन थांबवण्याची विनंती केली होती. या पत्रात त्यांनी असा दावा केला होता की, कुणाल कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरुद्ध कथित वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यामुळे त्याचे शो म्हणजे “विभाजनकारी वक्तव्यांना व्यासपीठ देणे” असून, हे शहरातील सार्वजनिक भावना आणि शांततेसाठी घातक ठरू शकते.
राहुल कनाल यांनी त्यांच्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले की, “अशा वक्तव्यांमुळे केवळ जनतेच्या भावना दुखावत नाहीत, तर सामाजिक सलोखा बिघडू शकतो. BookMyShow ने अशा शोला व्यासपीठ देणे म्हणजे अशा वक्तव्यांना मान्यता देणे होईल.” त्यांनी हे पत्र X वरही शेअर केले होते.
यावर प्रतिक्रिया देताना कामराने X वर लिहिले की, “Hello BookMyShow, कृपया तुम्ही मला खात्री देऊ शकता का माझ्या शोच्या लिस्टिंगसाठी तुमचे व्यासपीठ अद्याप खुलं आहे? नसेल, तर ठीक आहे. मी समजू शकतो.”
BookMyShow ने अधिकृत घोषणा न करता थेट सर्व शो हटवले. त्यामुळे ही कारवाई राजकीय दबावाखाली केली गेली असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यानंतर लगेचच राहुल कनाल यांनी BookMyShowच्या निर्णयाचे स्वागत करत ट्विट करत आभार मानले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कामराला तिसरे समन्स बजावले आहे. पोलीस त्याच्या निवासस्थानी जाऊन त्याची उपस्थिती तपासली होती. याआधीही कामराला दोन वेळा समन्स बजावण्यात आले होते.
या वादानंतर, कामराला किमान 500 हून अधिक मृत्यूच्या धमक्या (मिळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने तामिळनाडूला परत जाण्याचा निर्णय घेतला आणि मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court) धाव घेतली. त्याने अटकेपासून अंतरिम संरक्षण मागितले असून, न्यायालयाने त्याला दिलासा दिला आहे.