Ola Uber Drivers Strike: ओला-उबर चालकांचा संप तात्पुरता स्थगित, ‘OnlyMeter’ नुसार आकारणार भाडे

ola uber strike

Ola Uber Drivers Strike | ॲप-आधारित रिक्षा आणि टॅक्सीचालकांचा सुरु असलेला संप (Ola Uber Drivers Strike) सध्या तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. मात्र चालक संघटनांनी सरकारला 22 जुलैपर्यंतची मुदत दिली असून, तोपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास बुधवारपासून पुन्हा बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे.

या संपामागील (Ola Uber Drivers Strike) प्रमुख मागणी म्हणजे RTO ने निश्चित केलेले भाडेदर ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांवर सक्तीने लागू करावेत. सध्याचे कमी भाडेदर वाहनचालकांच्या खर्चाला पूरक नाहीत, असे चालकांचे म्हणणे आहे.

सध्या मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती परिसरातील टॅक्सी व रिक्षा चालक सरकारच्या अधिकृत भाडेदरानुसार सेवा देण्याचा आग्रह धरत आहेत. पुण्यात 1.5 किमीसाठी 37 रुपये आणि त्यानंतर प्रतिकिलोमीटर 25 रुपये अशी मागणी करण्यात आली आहे. काही चालकांनी सुरूवातही केली असून, www.onlymeter.in या संकेतस्थळावरून प्रवाशांना सरकारमान्य दर दाखवले जात आहेत.

मुंबईत काही टॅक्सीचालकांनी प्रति किमी 32 रुपयांप्रमाणे भाडे आकारणे सुरू केले आहे. ॲपवर दिसणाऱ्या दरांना फाटा देऊन ‘ओन्ली मीटर’ वापरून भाडे आकारण्याचा हा प्रयोग प्रवाशांसाठी नवा पर्याय ठरतो आहे.

या आंदोलनादरम्यान नालासोपाऱ्यातील एका चालकाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती, त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले. RTO अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत चालकांनी इंधन खर्च, वाहन देखभाल आणि कर्जाच्या हप्त्यांमुळे होणाऱ्या आर्थिक अडचणी स्पष्ट केल्या.

चालकांच्या इतर मागण्यांमध्ये ॲप कंपन्यांचे परवाने रद्द करणे, ई-बाईक टॅक्सींना बंदी, परवान्यांची मर्यादा आणि चालक कल्याण मंडळ स्थापन करणे यांचा समावेश आहे.

जर सरकारने 22 जुलैपूर्वी तोडगा काढला नाही, तर 23 जुलैपासून पुन्हा एकदा राज्यव्यापी संप होण्याची शक्यता असून याचा फटका प्रवाशांना बसू शकतो.

हे देखील वाचा –

कोल्हापुरात शक्तिपीठ समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा! घोषणाबाजी

पाकिस्तानात पुराचे थेट प्रसारण; पत्रकार वाहून गेला

प्राध्यापकांकडून मानसिक छळ दंतवैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या