Dattatray Bharane: विधिमंडळात रमी खेळल्याचे आरोप झाल्यानंतर अखेर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर त्याचा फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) खातेवाटपात बदल जाहीर करत त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले आहे. आता इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे ( Dattatray Bharane) हे राज्याचे नवे कृषी मंत्री (Agriculture Minister) असतील.
कृषीमंत्रीपदाच्या जबाबदारी मिळाल्यानंतर दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीमंत्री पदाचा मान दिल्याबद्दल मी कृतज्ञ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
खात्यात फेरबदल
कोकाटे यांच्याकडील कृषी खाते दत्तात्रय भरणे यांच्याकडे गेल्याने त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण खाते देण्यात आले आहे. रमी प्रकरणानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोरदारपणे केली होती. त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहेत.
‘कृषीमंत्री पदाचा मान दिल्याबद्दल कृतज्ञ’
कृषी मंत्रिपद मिळाल्याने दत्तात्रय भरणे यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीमंत्री पदाचा मान दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि माझे नेते मा. ना. अजितदादा पवार साहेब, तसेच उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यावर राज्याच्या कृषी मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली, याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभार मानतो.
एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीमंत्री पदाचा मान दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.
— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) August 1, 2025
राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि माझे नेते मा. ना. अजितदादा पवार साहेब, तसेच उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यावर राज्याच्या कृषी मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली,…
शेतकरी कुटुंबात जन्मलो, वाढलो आणि शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचे दु:ख, अडचणी आणि अपेक्षा मला अंतःकरणाने समजतात. आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला त्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. शेतकऱ्यांचा सन्मान, शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील. शासनाच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन, असे ते म्हणाले.
कर्जमाफीवर मौन
मंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर प्रश्न विचारला असता भरणे म्हणाले, “मी अजून पदभार स्वीकारलेला नाही. या विषयावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील.”