Maharashtra Economy | महाराष्ट्र राज्याच्या सकल राज्य उत्पादनात (Gross State Domestic Product) मोठी प्रादेशिक विषमता आढळून आली आहे. 2024 मध्ये राज्याचे सकल उत्पादन 45 लाख कोटी रुपये होते, त्यापैकी तब्बल 54 टक्के वाटा केवळ 36 पैकी सात जिल्ह्यांचा आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
देशातील आर्थिक महासत्ता म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रात ही सात जिल्हे आर्थिक घडामोडींचे प्रमुख केंद्र आहेत. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
सोळाव्या वित्त आयोगाला सादर केलेल्या अहवालानुसार, 18 जिल्ह्यांचा विकास दर राज्याच्या विकास दराच्या तुलनेत 0.8 पट कमी आहे आणि या जिल्ह्यांचे प्रति व्यक्ती उत्पन्न राज्याच्या सरासरी उत्पन्नापेक्षा कमी आहे.
सकल राज्य उत्पादन म्हणजे विशिष्ट कालावधीत राज्याच्या सीमांतर्गत उत्पादित वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य. अहवालात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे प्रति व्यक्ती उत्पन्न राष्ट्रीय सरासरीच्या 148 टक्के असले तरी, राज्यातील 12 जिल्ह्यांचे प्रति व्यक्ती उत्पन्न राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे.
अहवालानुसार, राज्य सरकारने 36 प्रशासकीय युनिट्सच्या सापेक्षिक सामर्थ्यावर आधारित संतुलित आर्थिक विकासाला गती देण्यासाठी पाच वर्षांची जिल्हा धोरणात्मक योजना तयार केली आहे.
प्रशासनाला विकास धोरणे कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्याने जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चात 11 टक्क्यांनी वाढ करून तो 20,150 कोटी रुपये केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा धोरणात्मक योजनेत नमूद केलेल्या प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी वार्षिक योजनेतील किमान 25 टक्के निधी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे अहवालात म्हटले आहे. जिल्ह्यांना जलद गतीने निधी उपलब्ध करून दिल्याने उत्पन्नात वाढ होऊन विकास अधिक समान होईल. आकांक्षी जिल्हे आणि तालुक्यांना अतिरिक्त निधी पुरवला जात आहे.
अहवालात नमूद केले आहे की, पूर्व महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचा पोलाद केंद्र म्हणून विकास केला जात आहे. आर्थिक वाढ आणि जिल्ह्यनिहाय उत्पादन यानुसार जिल्ह्यांचे तीन विभागांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे, अहवालात म्हटले आहे की, 36 जिल्ह्यांपैकी 50 टक्क्यांहून अधिक जिल्हे तिसऱ्या विभागात म्हणजे कमी उत्पादन किंवा प्रति व्यक्ती उत्पादन असलेले आहेत.
सर्वाधिक आर्थिक घडामोडी असलेले आणि राज्याच्या एकूण उत्पादनात 54 टक्के योगदान देणारे सात जिल्हे रायगड, नागपूर, पुणे, ठाणे, पालघर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे आहेत. दुसऱ्या विभागात 11 जिल्हे हे वर्धा, चंद्रपूर, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर हे असून, ज्यांचा एकत्रित वाटा 26 टक्के आहे.
अहवालात पुढे म्हटले आहे की, यवतमाळ, अमरावती, अकोला, नांदेड, भंडारा, गोंदिया, धुळे, जळगाव, हिंगोली, बुलढाणा, गडचिरोली, नंदुरबार, लातूर, परभणी, बीड, वाशिम, धाराशिव आणि जालना या18 जिल्ह्यांचा राज्याच्या एकूण उत्पादनात 20 टक्के योगदान देतात.