तापमानाचा उच्चांक! महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा ‘येलो’ अलर्ट, नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

Weather Alert Maharashtra

Weather Alert Maharashtra | देशभरात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून, एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात 20 हून अधिक शहरांमध्ये तापमान 42°C च्या पुढे गेल्याची नोंद झाली आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तर, मध्य व पश्चिम भारतातील अनेक भागांसाठी उष्णतेचा इशारा जारी केला असून, दिल्ली (Delhi), राजस्थान (Rajasthan), पंजाब (Punjab), हरियाणा (Haryana), गुजरात (Gujarat), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि महाराष्ट्र (Weather Alert Maharashtra) यांना त्याचा मोठा फटका बसत आहे.

मुंबईत (Mumbai) देखील उष्णतेचा तीव्र परिणाम जाणवला असून, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयाजवळील रस्ता वितळल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत 34°C तापमान नोंदले गेले, ज्यात दमट हवामानामुळे त्रास आणखी वाढला. IMD ने शहरासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, वृद्ध, मुले आणि मैदानी काम करणाऱ्यांसाठी यामुळे मध्यम स्वरूपाचा आरोग्य धोका निर्माण होऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राजस्थानच्या बारमेरमध्ये (Barmer) सर्वाधिक म्हणजे 46.4°C तापमान नोंदवले गेले. महाराष्ट्रातील जळगावमध्ये (Jalgaon) 42.5°C तापमान होते, तर दिल्लीमध्ये (Delhi) 40°C पर्यंत तापमान पोहोचले.

राजधानी दिल्लीत एप्रिलमधील गेल्या 3 वर्षांतील सर्वात उष्ण रात्र नोंदली गेली, जिथे रात्रीचे तापमान 25.6°C होते. याचबरोबर, दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावून AQI 209 वर पोहोचली आहे, जी ‘खराब’ श्रेणीत मोडते.

IMD च्या माहितीनुसार, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील 27 हवामान केंद्रांनी 43°C किंवा त्याहून अधिक तापमानाची नोंद केली आहे. यापैकी 19 ठिकाणी उष्णतेची लाट किंवा तीव्र उष्णतेची लाट अशी स्थिती असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमानातील ही वाढ आगामी उन्हाळा अधिक लांब आणि कठीण असेल, याचे संकेत देत आहे. उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) जूनपर्यंत 40°C पेक्षा जास्त तापमान राहण्याचा अंदाज आहे. बुंदेलखंडला विशेषतः उष्णतेचा मोठा फटका बसू शकतो.

दरम्यान, दक्षिण भारतात हवामानाचे स्वरूप वेगळेच असून, तेलंगणा राज्यात हैदराबाद आणि निजामाबाद येथे उष्णतेसोबतच थोड्याफार थंड वार्‍यांचाही अनुभव येत आहे. आंध्र प्रदेशमध्ये 13 एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे.

IMD ने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, उष्माघातासारख्या त्रासांपासून वाचण्यासाठी अधिकृत सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. वादळी हवामानामुळे काही भागात तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता आहे, मात्र त्याचबरोबर अचानक पूर आणि वाऱ्यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानाचाही धोका असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.