Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत 26.34 लाख लाभार्थी अपात्र: पुरुषांनीही घेतला लाभ; कारवाई होणार?

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाखो महिला लाभ घेत आहेत. या योजनेंतर्गत महिन्याला थेट खात्यात 1500 रुपयेजमा होतात. मात्र, आता या योजनेत गंभीर गोंधळ उघडकीस आला आहे.

या योजनेतील 26.34 लाख लाभार्थी अपात्र असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, काही पुरुष या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे अशा अपात्र लाभार्थ्यांवर सरकार कारवाई करण्याची शक्यता आहे.

पुरुष लाभार्थ्यांचा उघड झाला प्रकार

महिला लाभार्थ्यांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ तब्बल जवळपास 14 हजार पुरुषांनी घेतल्याचे उघड झाले आहे. यामुळे हे सर्व पुरुष लाभार्थी योजना यादीतून वगळण्यात आले आहेत. याशिवाय, अजून एक धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल 26.34 लाख महिला देखील या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत.

अदिती तटकरे यांनी दिली माहिती

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली. त्यानुसार, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या तपासणीत या अपात्र लाभार्थ्यांचा तपशील समोर आला. काही महिलांनी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतल्याचे, तर काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा अधिक अर्जदार असल्याचे समोर आले. काही प्रकरणांत पुरुषांनीही अर्ज केल्याचे निदर्शनास आले.

या पार्श्वभूमीवर, जून 2025 पासून या 26.35 लाख लाभार्थ्यांना मिळणारा सन्माननिधी तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. तरीही, पात्र ठरलेल्या अंदाजे 2.25 कोटी महिलांना जून महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्यात आला आहे.

ज्यांचा लाभ रोखण्यात आला आहे, त्या लाभार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत फेरतपासणी केली जाणार आहे. ज्यांना खरेच पात्र ठरवले जाईल, त्यांना पुन्हा लाभ सुरू करण्यात येईल. मात्र, योजनेचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.