Maharashtra EV Policy 2025 | महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 (Electric Vehicle (EV) Policy 2025) अधिकृतपणे जाहीर केले आहे. नुकतेच याबाबतचा जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या धोरणाचा उद्देश राज्यात इलेक्ट्रिक मोबिलिटी वाढवण्याचा असून, 2030 पर्यंत सर्व नवीन वाहन नोंदणीत 30% इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) समावेश करण्याचं मोठं लक्ष्य यामध्ये निश्चित करण्यात आलं आहे.
धोरणानुसार, वेगवेगळ्या वाहन प्रकारांसाठी विशिष्ट टक्केवारी ठरवण्यात आली आहे. दुचाकींसाठी 40%, तीनचाकीसाठी 30 ते 40%, चारचाकीसाठी 30%, बससाठी 40%, तर मालवाहू वाहनांसाठी 20 ते 25% EV असावेत, असा उद्देश आहे. कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या वाहनांसाठी 10% EV वापराचा निर्धारही करण्यात आला आहे. EV तंत्रज्ञान आणि चार्जिंग पायाभूत सुविधा (मजबूत करून महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य बनवण्याचं धोरण आहे.
या प्रयत्नात टोल माफी, कर सवलती आणि वित्तीय प्रोत्साहनांचा समावेश आहे. EV खरेदीवर दुचाकींसाठी 10,000 रुपये, तीनचाकीसाठी 30,000 रुपये, चारचाकीसाठी 1.5 लाख रुपये, तर व्यावसायिक गाड्यांसाठी 2 लाखांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग, अटल सेतू यांसारख्या प्रमुख मार्गांवर EV वाहने चालवणाऱ्यांना 100% टोल माफी मिळणार आहे. तसेच, प्रत्येक 25 किमी अंतरावर महामार्गांवर चार्जिंग स्टेशन उभारण्याचाही निर्धार या धोरणात करण्यात आला आहे.
नवीन निवासी इमारतींमध्ये 100% EV चार्जिंगसाठी तयार पार्किंग जागा बंधनकारक करण्यात येणार आहे, तर व्यावसायिक इमारतीत 50% पार्किंग जागा EV चार्जिंगसाठी राखीव ठेवण्याचं बंधन असेल. हे धोरण 1 एप्रिल 2025 पासून लागू होऊन 31 मार्च 2030 पर्यंत प्रभावी राहणार आहे.
राज्याच्या परिवहन विभागाला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलं असून, विविध संबंधित विभागांची एकत्रित अंमलबजावणी सुनिश्चित केली जाणार आहे. याशिवाय, राज्य सरकारी विभाग, शहर वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा आणि खाजगी फ्लीट ऑपरेटर यांना त्यांच्या ताफ्यांपैकी किमान 50% वाहने EV बनवणे आवश्यक असेल.
धोरणानुसार, 2030 पर्यंत वाहतूक क्षेत्रातून 325 टन PM 2.5 आणि 1 दशलक्ष टन GHG उत्सर्जनात कपात होण्याची शक्यता आहे. बॅटरी पुनर्प्रक्रिया, सर्क्युलर इकॉनॉमी, R&D, कौशल्य विकास, स्थानिक EV उत्पादन आणि नवोपक्रम यावरही धोरणात विशेष भर देण्यात आला आहे.