महाराष्ट्रात आता पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षण! शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Dada Bhuse

Military Training in Primary Education | महाराष्ट्र सरकारने शिक्षण क्षेत्रात मोठा निर्णय घेतला असून, आता विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण मिळणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली असून, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, शिस्त, संघटितपणा आणि व्यायामाच्या सवयी रुजवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारच्या या नव्या योजनेनुसार, विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण दिले जाणार आहे. सेवानिवृत्त सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसी आणि स्काऊट गाईडचे शिक्षक हे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. राज्यात सुमारे अडीच लाख माजी सैनिक असून, त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक सक्षमता, शिस्तबद्ध जीवनशैली आणि स्वसंरक्षणाच्या कौशल्यांचा विकास होईल, असा सरकारचा विश्वास आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.

या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच याच्या अंमलबजावणीसाठी सरकार पावले उचलणार आहे, असे भुसे म्हणाले. मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले की, शिक्षण व्यवस्थेत ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना रुजवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जिल्हा परिषदेच्या 48 शिक्षकांना अभ्यास दौऱ्यासाठी सिंगापूर येथे पाठवण्यात आले होते, जिथे राष्ट्र प्रथम ही संकल्पना शिक्षणात प्रभावीपणे राबवली जाते. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी सरकार अनेक नवे उपक्रम राबवणार आहे.

शालेय सहलींचे स्वरूपही बदलणार असून, विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर, बँकेत आणि रुग्णालयात भेट देण्याची संधी मिळणार आहे, जेणेकरून त्यांना व्यवहारज्ञान मिळेल. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘हेल्थ कार्ड’ प्रणाली लागू करण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांचे आरोग्य नियमितपणे तपासले जाईल आणि आवश्यक उपचार दिले जातील. येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात हे बदल दिसून येतील, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रातील या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि शिस्तबद्ध जीवनशैली विकसित होण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे.